चंद्रपूर महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले रक्तदान

चंद्रपूर : केंद्रातील भाजपच्या सरकारच्या सप्तवर्षपूर्तीनिमित्त सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. उपक्रमाअंतर्गत लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार मित्र परिवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी रक्तदान केले.

गंज वार्ड येथील आयएमए सभागृहात शुक्रवार दि. 11 जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे महामंत्री राजेंद्र गांधी, नगरसेवक सुभाष कासनगोटुवार, माजी नगरसेवक रवींद्र गुरुनुले, नगरसेविका छबूताई वैरागडे, नगरसेविका शीतल आत्राम, प्रकाश धारणे, रामकुमार अकापेल्‍लीवार, स्‍वेच्‍छा रक्‍तदान शिबिर प्रकल्‍प संयोजक प्रशांत विघ्‍नेश्‍वर उपस्थित होते.

कोरोनाच्‍या संकटामध्‍ये रक्‍ताची गरज भासत असते. अशा गरजवंत रुग्णांना माझे रक्त उपयोगी पडत असेल तर, तो माझा खारीचा वाटा ठरेल. आता तिसऱ्या लाटेचे संकट उभे आहे. अशावेळी रुग्‍णांची हेळसांड होऊ नये यासाठी सामाजिक बांधीलकी म्हणून नागरिकांनी रक्‍तदान करावे, असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार यांनी केले. केंद्रातील भाजपच्या सरकारच्या सप्तवर्षपूर्तीनिमित्त ३१ मे २०२१पासून आमदार सुधीर मुनगंटीवार मित्र परिवारातर्फे रक्‍तदान शिबीर सुरु आहे. प्रास्‍ताविक सुभाष कासनागोट्टुवार, संचालन प्रशांत विघ्‍नेश्‍वर यांनी केले.