चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर, अमरावती व औरंगाबाद विभागातील सरपंचांना दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. दरम्यान काही सरपंच्यांशी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी कोरोनामुक्त गाव याबाबत सरपंचांशी थेट संवाद साधला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील, पोंभूर्णा तालुक्यातील जाम तुकुम येथील भालचंद्र बोधलकर या सरपंचाने कोरोना काळात गावामध्ये करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, आरोग्य विषयक सोयी सुविधा,आदी केलेल्या कार्याचे अनुभव कथन केले.
यावेळी, सदर संवाद कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचना केंद्र येथून मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, तसेच पोंभूर्णा तालुक्यातील जाम तुकूम गावचे सरपंच भालचंद्र बोधलकर, मूल तालुक्यातील राजगढ गावचे सरपंच रवींद्र चौधरी, भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गावचे सरपंच नयन जांभुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
कोरोना विरोधात प्रभावी कामगिरी केलेल्या काही निवडक ग्रामपंचायतीच्या सरपंच्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी निवड करण्यात आली होती. यात चंद्रपूर जिल्ह्यातील जाम तुकुम येथील सरपंच भालचंद्र बोधलकर यांनी मुख्यमंत्रांशी संवाद साधला.
‘जिल्हा परिषदेमार्फत व प्रशासनामार्फत वेळोवेळी मिळालेल्या बहुमोल मार्गदर्शनामुळे आजपर्यंत ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोना विरोधात प्रभावी नियंत्रण मिळवता आले’ ही बाब त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचप्रमाणे कोरोनाच्या विरोधात काम करताना आलेल्या अडचणी व अनुभव सांगितले. त्याचबरोबर माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गावात सॅनीटायजर, साबण व मास्कचे वाटप केले. प्रशासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले. त्रिसूत्रीचा अवलंब केला. गावातील लोकांमध्ये लसीकरणा संदर्भात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी सरपंच म्हणून पहिल्यांदा स्वतः लसीकरण करून घेतले. लस अत्यंत प्रभावी आहे व त्यापासून कोणताही धोका नाही, हे लोकांना सर्वप्रथम पटवून दिले. त्यामुळेच गावातील नागरिकांचे 97% लसीकरण पूर्ण करणे शक्य झाले. असेही सरपंच बोधलकर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
गावामध्ये दक्षता समिती नेमली, गावामध्ये विलगीकरण कक्ष उभारले.गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच आयएलआय व सारी रुग्णांची तपासणी वेळोवेळी करण्यात आली. ज्या व्यक्तीमध्ये लक्षणे आढळून आली त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.
गावातून बाहेर जाणाऱ्या व गावात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची नोंद ठेवण्यात आली. त्यामुळेच गाव कोरोना मुक्त ठेवण्यास मदत मिळाली.गावातील लोकांवर उपासमारीची पाळी येऊ नये, यासाठी मनरेगाची कामे सुरू केली. कामाच्या ठिकाणी प्रत्येक मजुराची आरटीपिसीआर व अॅटींजेन चाचणी करून घेतली. असेही ते म्हणाले. तसेच तिसऱ्या लाटे संदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भातही सरपंच बोधलकर यांनी माहिती दिली.