हृदयातील माणसे : प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे चळवळीची तळमळ असलेला नेता !

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
समाजात खुप थोर धनवान, गर्भश्रीमंत लोक आहेत. परंतू समाजाकरिता त्यांचं योगदान काहीच दिसत नाही. किंबहूना ते फक्त स्वतःच्या कुटुंबापुरतेच मर्यादित असतात. देशात, महाराष्ट्रात अनेक सामाजिक क्रांतीकारी चळवळी झाल्याचे आपल्याला ज्ञात आहे. त्या कालखंडात मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून आर्थिक मदत चळवळींना करण्यात येत होती. कालांतराने आर्थिक पाठबळ नसल्याने या चळवळी कुठेतरी थांबल्याचे दिसून येत आहे. समाज चांगल्या रस्त्याने नेण्याकरिता चळवळी उभ्या होणे ही काळाची गरज आहे. सद्या समाजात चळवळीत राजकारण आल्यामुळे कुठेतरी हे लोप पावत असल्याचे दिसून येते. आम्हा तिशीतल्या युवकांना चळवळीत प्रामुख्याने सहभागी होण्यासाठी एका व्यक्तीने नेहमी प्रोत्साहित केलं आहे. त्या व्यक्तीमध्ये मी नेहमी आर्थिक बाबींची कसलीही पर्वा न करता काम उभे करण्याची तळमळ बघितली. चळवळींना हिंमत देवून तळागाळातील लोकांना एकत्रित करुन लढाई लढण्याचे बळ ते देत असतात. हल्लीच्या काळात चळवळीची तळमळ असलेला नेता आम्हा युवकांना मिळणं, हे आमचं भाग्यच !
पुर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात अशोकभाऊ जिवतोडे हे प्रचलित नाव. शैक्षणिक क्षेत्रात भाऊंनी जेवढी भरारी घेतली तेवढीच सामाजिक क्षेत्रात पकड आहे‌. पर्यावरणपूरक वृक्षलागवड, भव्य रक्तदान शिबिर, जनजागृतीपर भव्य कीर्तनाचे व व्याख्यानाचे कार्यक्रम, व्यसनमुक्ती कार्यक्रम, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन, स्वतंत्र विदर्भ राज्याची चळवळ, ओबीसी समाजाची चळवळ पूर्व विदर्भात सक्रियतेने भाऊ चालवीत आहेत. मोठ्या संस्थेचा प्रमुख, पण कुणीही सहज भेटू शकतो. माझी देखील त्यांच्याशी अशीच ओळख झाली. सकाळ मध्ये मी ‘YIN’ या युवकांच्या व्यासपीठाचा जिल्हा समन्वयक या पदावर काम करीत होतो. जनता महाविद्यालयामध्ये जिल्यातील सर्व आमदार येणार होते. युवकांशी नेतृत्व विकासाबाबत संवाद साधणार होते. त्यावेळी त्यांना युवक नेतृत्वाबाबत संकल्पना सांगताच त्यांनी होकार दिला. विनम्रता व सरळपणा हा त्यांचा स्वभाव. ‘बोलून मोकळं होणं’ असा त्यांचा अनुभव पहिल्या भेटीतच आला होता. कार्यक्रम जवळ जवळ येताच सर्वांचं टेशंन वाढू लागलं. भाऊ स्वतःहून विचारपूस करू लागले. कार्यक्रमाची जबाबदारी माझी असून देखील ते स्वतः नियोजनाचा आढावा घेत असे. कधी रागावले तरी दोन तासांनी पुन्हा जवळ घेऊन बसवतात व मिश्किलपणे ‘चायला माझी बीपीच वाढून जाते’ म्हणून हसवून टाकतात. हा अनुभव मी पहिल्यांदा घेतला. पुढे तो कार्यक्रम यशस्वी देखील झाला. याचे श्रेय देखील त्यांचेच.
स्वतंत्र विदर्भ राज्य मिळावे, यासाठी नागपूर ते चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली त्यांनी ढवळून काढली. विदर्भ चळवळीसाठी आजपर्यंतचा सर्वात मोठा कार्यक्रम चंद्रपूरात अशोकभाऊंनीच घेतला. विदर्भासाठी मतदान प्रक्रियेत पूर्णत: सक्रिय सहभाग नोंदवला. दरवर्षी १ मे रोजी विदर्भ राज्याचा प्रतिकात्मक झेंडा हजारो विदर्भप्रेमीच्या समक्ष ते फडकवतात. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून पूर्व विदर्भात ओबीसी चळवळ सक्रिय करण्याचे कार्य प्राचार्य डॉ.अशोकभाऊ जीवतोडे यांनीच केले. या उपक्रमाचा मी देखील साक्षीदार आहे.
पुढे देखील त्यांच्या सोबत अनेक प्रसंग अनुभवता आले. ते एक कुशल संघटक आहेत. मी आमदार नानाभाऊ शामकुळे यांच्याकडे स्वीय सहायक म्हणून होतो. तेव्हा अनेकदा आम्ही अशोक भाऊ कडे जात असत. त्यांच्या बोलण्यातून सर्वसामान्य नागरिकांविषयी नेहमी आपुलकी जाणवत होती. ओबीसी समाजामध्ये एक नवी ऊर्जा निर्माण व्हायला हवी, एक लोकचळवळ व्हावी, असं त्यांना नेहमी वाटायचं. एक चळवळीतला नेता मला त्यांच्यात दिसत होता.
एखादे काम हाती घेतले की ते भव्यदिव्यच होऊ द्यायचे, यशस्वी करून दाखवायचे, ही त्यांची ख्याती बनली आहे. समाजकार्यासाठी साधारणतः खिशातून शंभर रुपये काढायला कुणी तयार नसते. मात्र अशोकभाऊ सामाजिक कार्यावर हजारो-लाखो रुपये खर्च करतात. अलीकडेच सर्वांच्या डोळ्यासमोरील हा प्रसंग आहे, आमदार अभिजित वंजारी हे विधान परिषद मतदार संघातून निवडून आले. परंतू ही निवडणूक अशोकभाऊ मुळेच अधिक सोपी झाली. या निवडणुकीत त्यांनी एक जाहीर सभा त्यांच्या जनता महाविद्यालयातील पटांगणात घेतली. तेथे तळागाळातील शिक्षक व पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही किमया फक्त अशोकभाऊच करू शकतात. या मतदार संघात त्यांनी ज्यांना सहकार्य केले तीच व्यक्ती आजवर निवडून आली हा इतिहास आपल्याला विसरता कामा नये. चळवळींना सक्षम करण्यासाठी व सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, शैक्षणिक क्षेत्राला अधिक समृद्ध करण्यासाठी त्यांना वाढदिवसाचा शुभेच्छा पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना !
✍️ गोविल मेहरकुरे…