उद्यापासून पाच दिवस जनता कर्फ्यु ;  वरोरा कोरोनाचे हाॅटस्पाॅट ठरल्याने निर्णय

चंद्रपूर : जिल्ह्यात वरोरा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून कोरोनाचे हाॅटस्पाॅट ठरले आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने उद्या 13 एप्रिल पासून तर 18 एप्रिलपर्यंत जनता कर्फ्युची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे पाच वरोरा शहर बंद राहणार आहे.
आज सोमवारी वरोरा येथे 205 रूग्णांची भर पडली असून एक पुरुष आणि एक महिला अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दर दिवशी वरोरा येथे बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे स्थानिक प्रशासनाला या ठिकाणी उपाययोजना गरजेचे झाले आहे. त्या अनुषंगाने आज सोमवारी स्थानिक प्रशासनाने वरोरा शहरातील जनप्रतिनिधी व सामाजिक संस्था यांचे मत जाणून घेतले.

यावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यु आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या कर्फ्युत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी आरोग्य विभागाच्या तपासणी पथकाला सहकार्य करावे अशी विनंती तहसीलदार यांनी केली असून सध्या कोरोना रुग्णासाठी सिद्धिविनायक मंगल कार्यालय अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यांना गृह विलीगिकरण शक्य नाही त्यांना या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे.