ध्येयवेडा बाळू दिवस रात्र कोरोनाग्रस्तांच्या सेवेत

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कोरोना महामारीने थैमान घातले आहे, यात राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना महामारीचे संकट निर्माण झाले असून प्रत्येक रुग्णालयासमोर रुग्णांची व नातेवाईकांची गर्दी उसळत आहे. आरटीपीसीआर चाचणीत पॉजीटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर रक्ताच्या नातेवाईकांकडून मिळणारी वागणूक व समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो, काहींपासून तर रक्ताचे नातेवाईक दुरावलेले असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असताना राजुरा तालुक्यातील चुनाळा वासीयांच्या गळ्यातील ताईत, समाजसेवेचे व्रत स्वीकारलेल्या ध्येयवेड्या बाळू अनेकांना आधार देत त्यांना कोरोनातून सावरण्यासाठी रुग्णालयात मदतीचा हात देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करीत असताना सतत दिसून येत आहे.

आताच्या स्थितीत खाजगी रुग्णालय असो की, शासकीय रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी धडपड करीत आहे, रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्याची केविलवाणी विनंती करताना दिसत आहे, अशा व इतर कोणत्याही प्रकारच्या समस्या व अडचणीच्या वेळी मदतीचा हात देत असलेला एक ध्येयवेडा समाजसेवेत स्वतःला झोकून दिलेला सरपंच पदावर आरूढ झालेले व्यक्तिमत्व चुनाळा ग्रा. पं.चे सरपंच बाळू वडस्कर हे सतत धडपड करीत आहे. मागील ग्रा. पं. च्या निवडणुकीत सात महिला सदस्य निवडून आलेल्या असतांना व सरपंच पद महिला राखीव असतांना सुध्दा कुणीही सरपंच पदाचा फार्म न भरता बाळूलाच सरपंच पदावर विराजमान करण्याचा चमत्कार केला हे सर्वश्रुत आहे. राजुरा रुग्णालयात उपचारासाठी अडचण येत असल्यास चंद्रपूर किंवा प्रसंगी नागपूरला सुद्धा उपचार करण्याकरीता प्रत्यक्ष जाऊन बाळू मदत करीत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या जवळ कोणी नसताना त्यांच्या नातेवाईका सोबत स्वतःराहून, दुदैवाने रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीची पूर्ण तयारी करण्यास अग्रस्थानी राहून शेवटच्या क्षणापर्यंत मदत करण्याचे धाडस करीत आहे.

बाळू वडस्कर यांना मध्यंतरी कोरोनाची लागण सुद्धा झालेली होती, जिवाची पर्वा न करता समाजसेवा अंगिकारून धाडसाने बाळू वडस्कर पुन्हा समोर आले. यांच्याकडे केवळ चुनाळाच नव्हे तर तालुक्यातील गावोगावचे समस्याग्रस्त नागरिक मदतीसाठी मोठ्या आशेने बाळू कडे पाहत आहे. हा समाजसेवक मदत करताना समोरचा मदतीचा हात मागणारा कोणत्या गावाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता लगेच त्या व्यक्तीला मदत करण्याचे काम करीत आहे. “गुरु से भी चेला सवाई” या उक्तीनुरूप माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या तालमीत तयार झालेल्या या धेय्यवेढ्या कार्यकर्त्याला कोरोना महामारीच्या या जीवघेण्या गंभीर संकट काळात स्वतःची काळजी घेऊन मदतकार्य करण्याच्या सूचना निमकर सातत्याने देत आहेत.

बाळू वडस्कर हे वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी व इतर संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून आलेल्या प्रत्येक समस्यांचे निराकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असतात. कोरोना महामारीत बाळू वडस्कर यांच्या धडपडीमुळे बऱ्याच गोरगरीब रुग्णांचे प्राण वाचले आहे. नेहमी आपल्याला समाजात पाहायला मिळते एकदा खुर्ची मिळाली की पदाची नशा अंगात येत असते, मात्र बाळू वडस्कर याला अपवाद असून स्वतःला त्यांनी दिवस रात्र सामाजसेवेत झोकून दिले आहे.

या परिस्थितीत बाळू यांनी स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला अधिकारी व ज्येष्ठ मंडळी देत असले तरी बाळूच्या रक्तात असलेली समाज सेवेची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. यासारखीच काही राजकारणात असलेल्या जनप्रतिनिधींनी काही प्रमाणात समाजसेवा करण्याचे ठरविल्यास अनेक गोरगरिबांना योग्य न्याय व दिलासा मिळाल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यातील अनेक गोरगरीब व सामान्य नागरिकांकडून बाळूभाऊ च्या या सेवाभावी कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा होत असून देवदूताच्या रुपात बाळू कडे पहात आहे.