केंद्रामुळे नमामी गंगेचे शवामी गंगेत रूपांतर : खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर : देशामध्ये कोरोनाच्या काळात विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. उत्तर प्रदेश मध्ये नमामी गंगा अशी प्रधानमंत्री मोदींनी २०१४ मध्ये राष्ट्रीय कार्यक्रमाची घोषणा केली होती. परंत्तू आता मात्र परिस्थिती ‘शवामी गंगे’ अशी झाली आहे. आज गंगा नदीवर ४० टक्के लोकांचं जीवनमान अवलंबून असलेली हि पवित्र नदी आहे. जगाच्या नकाशावर सांस्कृतिक व पवित्र नदी असा उल्लेख आहे. आज ७ वर्षाच्या मोठा कालखंड लोटून देखील केंद्र सरकारच्या उदासीनतेमुळे व नियोजनशून्य कामामुळे नमामी गंगेचे शवामी गंगेत रूपांतर झाल्याचे दिसून येते. नदीच्या पात्रात शेकडो मृतदेह वाहत येत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. त्यामुळे भारताची मान शरमेनं खाली गेल्याचं खासदार बाळू धानोरकर यांनी म्हटलं आहे. हा संपूर्ण भारतवासियांचा जगभरात झालेला अपमान आहे. कोरोना विरोधी लढ्यात मोदी सरकारनं विरोधी पक्षांना आणि त्यांच्या सुचनांना सामावून घेण्याचं आवाहनही खासदार बाळू धानोरकर यांनी केल आहे.

२०१४ रोजी भारतातील प्रदूषित गंगा नदी आपण स्वच्छ करू त्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामि गंगे असा कार्यक्रम राबविला. २०१५ मध्ये भाजप सरकारने या नदीच्या पंचवार्षिक स्वच्छता योजनेसाठी २० हजार कोटी रुपया देण्याच्या आश्वासन दिले होते. मोदींचा वाराणसी मतदारसंघात गंगेच्या तीरावरील एक महत्वाचं यात्रास्थळ आहे. तिथे देखील अशीच विदारक परिस्थिती आहे.

गाझीपूरमध्ये मृतदेह वाहून जात आहेत. तर उन्नावमध्ये नदी किनाऱ्यावर शेकडो मृतदेह पुरले जात आहेत. लखनऊ, गोरखपूर, झांरी, कानपूर, अशा शहरांमधील मृत्यूचा आकडा अनेक पटींनी कमी करुन सांगितला जातोय. उत्तर प्रदेशात मर्यादा ओलांडून अमानवतेचं दर्शन होत आहे. सरकार आपली प्रतिमा बनवण्यात व्यस्त आहे आणि जनतेचं दु:ख असह्य बनत चाललं आहे.

त्यामुळे जगात देशाचे नाव चुकीच्या पद्धतीने जात आहे. कोरोनाच्या उपायोजना करण्याकरिता विरोधी पक्षाच्या सूचना देखील विचारात घ्याव्या, कोरोनाची लढाई हि फक्त भाजपाची नसून सर्वांची आहे. त्यामुळे या लढाईत राजकारण न करता सर्वाना सोबत घेऊन निर्णय घ्यावे अशी विनंती महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.