चंद्रपूर : 20 मे रोजी पंतप्रधान जिल्ह्याच्या आरोग्यविषयक सोयी-सुविधांचा आढावा घेणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील. त्यामुळे सादरीकरण करीत असतांना डिस्चार्ज झालेले रुग्ण, दैनंदिन बाधित रुग्ण, मृत्यू, ॲक्टिव्ह रूग्ण, आरटीपिसीआर तसेच अॅटिंजेन तपासणी, आयएलआय व सारी रुग्णांची दैनंदिन माहिती अद्यावत ठेवावी असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाला दिले.
यावेळी तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत कोविड विषयक आढावा घेतला. ज्या तालुक्यात खाजगी कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहेत त्यासाठी ऑडिटरची टीम नेमण्यात आली असून रुग्णांकडून आकारण्यात आलेल्या अतिरिक्त बिलांच्या रकमेची तपासणी करण्यात येत आहे. तसेच कोणतीही परवानगी नसतानां मान्यता नसलेले काही डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करतात व त्यांची आर्थिक लूट केल्या जाते असे होता कामा नये.
जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासू नये, तसेच येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेला गृहीत धरून हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व काही अतिरिक्त फॅसिलिटी वाढविण्याच्या दृष्टीने उपलब्ध जागा पाहून ठेवाव्यात.व सदर प्रस्ताव तातडीने सादर करावेत असे ते म्हणाले. जिल्ह्यात नो मास्क, नो एन्ट्री ही मोहीम राबविण्यात आली होती ती यशस्वी झाली असून पुनश्च: ही मोहीम सुरु करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले की, ग्रामीण भागात नागरिकांना कोविड सदृश्य लक्षण आहेत. त्यामुळे नागरिकांनी सामोरे येऊन स्वतःची आरोग्य तपासणी करून घ्यावी. आरोग्य विभागाने आयएलआय व सारीचे सर्वेक्षण घरोघरी जाऊन पूर्ण करून घ्यावे. सदर सर्वेक्षणात व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आल्यास कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करून घ्यावे.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी लसीकरणासंदर्भातही आढावा घेतला. कोरोनावर लसीकरण हा उपचार असून शहरी व ग्रामीण भागातील लसीकरण योग्य पद्धतीने व्हावे. लसीप्राप्त झाल्यानंतर जिल्हा अंतर्गत योग्य वितरण व्हावे. तसेच ज्या भागांमध्ये लसीकरणाला प्रतिसाद नाही त्या भागात लोकप्रबोधन व्हावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सर्व तालुक्यातील सद्यस्थिती जाणून घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.