म्‍युकोरमायकॉसिस आणि बालरूग्‍णांवरील उपचारासाठी आवश्‍यक उपकरणे त्‍वरीत उपलब्‍ध करावी : आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

चंद्रपूर : कोरोना उपचारादरम्‍यान स्‍टेरॉईड च्‍या अतिवापरामुळे म्‍युकोरमायकॉसिस या आजाराचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होत आहे. या बुरशीजन्‍य संसर्गाचे गंभीर परिणाम रूग्‍णांवर होत आहेत. राज्‍यभरात अशा रूग्‍णांच्‍या संख्‍येत मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. रोग प्रतिकारशक्‍ती कमी झाल्‍यामुळे कोविड रूग्‍णांमध्‍ये हा दुर्मिळ संसर्ग आढळत आहे. चंद्रपूर जिल्‍हयात आजघडीला म्‍युकोरमायकॉसिसचे १२ रूग्‍ण आढळल्‍याची नोंद आहे. म्‍युकोरमायकॉसिस या आजारावरील उपचारासाठी आवश्‍यक उपकरणे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथे तातडीने उपलब्‍ध करण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे.

म्‍युकोरमायकॉसिस या आजारावरील उपचारासाठी एमआरआय, सिटी विथ कॉन्‍ट्रास्‍ट, नेझल एन्‍डोस्‍कोप ही उपकरणे आवश्‍यक असून गोरगरीब रूग्‍णांना या आजारासंदर्भातील उपचार शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथे घेणे सोईचे व्‍हावे यादृष्‍टीने या उपकरणांची खरेदी तातडीने करण्‍याची आवश्‍यकता आहे. या उपकरणांसह सदर आजारावरील उपचारासाठी एमडी मेडीसीन तसेच नेफ्रोलॉजीस्‍ट तज्ञांची पदे मंजूर करून ही पदे भरण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍या माध्‍यमातुन या रूग्‍णालयात म्‍युकोरमायकॉसिस या आजारावर उपचार घेणे रूग्‍णांना सोईचे ठरेल, असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख व वैद्यकिय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांना पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे.

कोरोनाच्‍या तिस-या लाटेची शक्‍यता टास्‍क फोर्ससह अनेक तज्ञांनी व्‍यक्‍त केली आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका संभावण्‍याचा अंदाजही व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे. या संभाव्‍य संकटावर उपाययोजना करण्‍याच्‍या दृष्‍टीने शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथे पेड्रीयाटीक व्‍हेटीलेटर व न्‍युओनेटल तसेच सीपीएपी मशीन ही उपकरणे सुध्‍दा अत्‍यावश्‍यक आहे. या उपकरणांच्‍या माध्‍यमातुन बालरूग्‍णांवर प्रभावी उपचार करता येणार असल्‍याने ही उपकरणे सुध्‍दा तातडीने या रूग्‍णालयासाठी उपलब्‍ध करावी असे आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालयाच्‍या प्रशासनाने याबाबतचे प्रस्‍ताव शासनाकडे त्‍वरीत सादर करावे, अशा सुध्‍दा आ. मुनगंटीवार यांनी दिल्‍या आहे.