अमरावती : जिल्ह्यातील बेनोडा शहीद पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत नाव उलटून ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली असून अद्याप ३ मृतदेह मिळाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, एकाच कुटुंबातील ११ जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. काल दशक्रियेचा कार्यक्रम आटोपला. त्यानंतर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून नावेने जात होते.
मात्र, नियतीच्या मनात काय होते कोणास ठावूक. अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्वजण असल्याची प्राथमिक माहिती आहे. अद्यापही तिघांचे मृतदेह हाती लागले. यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे. थोड्याचवेळात बचाव पथक दाखल होणार आहे.