विलगीकरण कक्षासमोर कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड ला मारहाण; महिला सरपंचाला शिविगाळ

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल, एकास अटक
• आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्याचा पोंभूर्ण्यातील पहिला गुन्हा दाखल

चंद्रपूर : पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा गावातील ३८ लोकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना वेळवा येथील जिल्हा परिषद शाळेतल्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी सुरक्षेकरिता होमगार्ड विकास देवराव दुधबळे हे कर्तव्यावर असतांना दिनांक १३ मे २०२१ ला रात्रौ. ८ वाजताच्या दरम्यान मौजा वेळवा येथील रुपेश निमसरकार व रोहित जाधव हे जिल्हा परिषद शाळेतील विलगीकरण कक्षाकडे चारचाकी वाहनाने जाऊन तिथे कर्तव्यावर असलेले होमगार्ड विकास दूधबळे यांना हे कशाचे कोरोना सेंटर आहे.

असे म्हणून हुज्जत बाजी करून शिवीगाळ केली. त्याची कॉलर पकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार होमगार्ड विकास दुधबळे यांनी पोलीस स्टेशन पोंभुर्णा येथे दिल्याने रूपेश निमसरकार व रोहित जाधव यांच्या विरोधात ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ (ब) अन्वये गुन्हा दाखल करून यातील आरोपी रोहित जाधव याला तात्काळ अटक करण्यात आली.

मात्र यातील आरोपी रुपेश निमसरकार हा फरार झाला आहे.त्याचा शोध पोलिस घेत आहेत. पुढील तपास पोंभूर्णा पोलिस ठाण्याचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दादाजी ओललवार करीत आहेत. वेळवा येथील सरपंचाला शिविगाळ प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल.

पोंभूर्णा तालुक्यातील मौजा वेळवा येथील गाव समितीच्या अध्यक्षा व सरपंचा सिमा निमसरकार या जिल्हा परिषद शाळेतील विलगीकरण कक्षाकडे पाहणीसाठी जात असताना रुपेश निमसरकर व रोहित जाधव यांनी तिला रस्त्यात अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ केली तसेच तिला व तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली.

अशी तक्रार सरपंचा सिमा निमसरकार यांनी पोंभूर्णा पोलिस स्टेशनला दिल्याने रूपेश निमसरकार व रोहित जाधव यांच्या विरुद्ध 354, 341, 504, 506, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांचे मार्गदर्शनात बीट जमादार सुरेश बोरकुटे करीत आहे.