फिरायला न आल्याने पतीने पत्नीला ब्लेडने केले जखमी

0
1244
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• नवविवाहितेसोबत लग्नाच्या दुसर्‍या दिवशीची घटना

• सिंदेवाही तालुक्यातील लोणवाही येथील घटना

चंद्रपूर : नुकतेच लग्न होऊन घरी आलेली नवविवाहिता आपल्या पतीसोबत लग्नाच्या दुस-या दिवशी बाहेर फिरायला न गेल्याने संतापलेल्या पतीने तिच्यावर ब्लेडने वार करून जखमी केल्याची घटना मंगळवारी सिंदेवाही तालुक्यातील लोणवाही येथील राजीव गांधी कॉलनीत दुपारी अडीचच्या सुमारास घडली. पत्नीच्या तक्रारी वरून पती विरुद्ध गुन्हा दाखल करून पती प्रमोद माधव आत्राम ( 28) याला अटक केली आहे.

पोलिस सूत्रांनुसार, फिर्यादी काजल हिचे 14 मार्च रोजी चिमूर तालुक्यातील परसगाव येथील आरोपी पती प्रमोद आत्राम ह्याचे सोबत लग्न झाले होते. लग्नानंतर दुस-या दिवशी हे दोघेही लोणवाही येथील राजीव गांधी कॉलनीतील काजलच्या घरी म्हणजे माहेरी आले होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी पती प्रमोदने पत्नीसोबत बाहेर फिरायला जाण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु लग्नाचा दुसराच दिवस असल्याने असल्याने पत्नीने बाहेर फिरायला जाण्यास टाळले. त्यामुळे पतीला राग आला. रागाच्या भरात त्याने नवविवाहिता असलेल्या पत्नीच्या तोंडाला मागील बाजूने ब्लेडने वार केले तसेच गळ्यावर वार केले. ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली.

सदर घटनेची तक्रार सिंदेवाही पोलिसांत दाखल केल्यानंतर आरोपी प्रमोदला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सिंदेवाही पोलिस ठाण्याचे निरीक्षक योगेश घारे करीत आहेत.