चंद्रपूर : अनेक वर्षांपासून घुग्घुस ग्रामपंचायत ही नगरपरिषद व्हावी ही नागरिकांची मागणी होती. याकरिता स्थानिक नेत्यांनी आंदोलन केले, राजीनामे दिलेत आणि राज्य शासनाकडून नागरिकांच्या हिताकरिता आपल्या पदरात नगरपरिषद मागणी पाडून घेतली. 27 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर घुग्घुस ग्रामपंचायतला नगरपरिषदचा दर्जा मिळाला. आता पहिल्या नगरपरिषदेच्या निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्ष, स्थानिक नेते सक्रिय झाले आहेत. नगरपरिषदेवर आपली सत्ता कशी स्थापित करता येईल याकरिता चाचपणी सुरू झालेली आहे. भाजपामध्ये तर स्थानिक नेत्यांच्या इन्कमिंग वर चांगलाच जोर चढलेला आहे.
भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे हे जिल्ह्याच्या राजकारणात चांगलेच सक्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी काँग्रेससह अन्य पक्षातील नेत्यांची चांगलीच इन्कमींग करण्यात आली होती, परंतु ग्रामपंचायत निवडणुकीत बहूमत न मिळाल्याने ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंच यांना पक्ष प्रवेश देऊन प्रभारी सरपंच करण्यात आले.
मात्र 2017 नंतर पंचायत समिती सदस्य शालू शिंदे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणूकीत भाजप तिसऱ्या क्रमांकावर गेला व यानंतर झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घुग्घुस क्षेत्रात भाजपची पिछेहाट झाली. त्यातून धडा घेत भाजपने नगरपरिषद निवडणूकीत संख्याबळ वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांच्या इनकमिंगला सुरू केली आहे.
वेकोली क्षेत्रातील भाजपच्या एका माजी सदस्याच्या गडात त्यांच्या गैरहजेरीत काही कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला. प्रवेश घेणारे काही भाजपचेच जुने कार्यकर्ते असल्याचे निर्दशानास आले. या यासह इतर वॉर्डात ही कार्यकर्त्यांचे प्रवेश कार्यक्रम शुरू आहेत.
नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्ष स्थानिक नेत्यांना हाताशी धरून जोर बांधीत आहेत. येणाऱ्या वेळेतच कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात किंबहुना नगरपरिषदेवर कोणत्या पक्षाचे वर्चस्व निर्माण होईल ही हे वेळच ठरवणार आहे. परंतु एक मात्र निश्चित घुग्घुस मध्ये या निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे कार्यकर्त्यांचे इन्कमिंग वरून दिसून येत आहे.