• कामगारांना लसीकरणात प्राथमिकता देण्याची मागणी
चंद्रपूर : घुग्घुस वेकोली वणी क्षेत्रातील कामगार, अधिकारी जीव धोक्यात घालून रात्रंदिवस काम करीत असले तरी त्यांना कोरोना लस मिळत नसल्याने ते व त्यांचा परिवार चिंतित आहे. वेकोलीच्या कामगारांना लसीकरणात प्राथमिकता देण्यात यावी, अशी मागणी चार ट्रेंड युनियनच्या पदाधिकाऱ्याची संयुक्त बैठकीत केली.
मागणीची दखल न घेतल्यास २७ मे ते २९ मेदरम्यान कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा चंद्रपूर व यवतमाळ जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. वेकोली वणी क्षेत्राच्या आयटक कार्यालयात एचएमएस, बीएमएस, आयटक व सिटू या चारही कामगार संघटनेची संयुक्त बैठक झाली.
कोरोना या महामारीत अनेकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. शासनाने विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन त्यांना लसीकरणात प्राथमिकता दिली. मात्र वेकोलीचे कामगार, अधिकारी रात्रंदिवस काम करून सेवा देत असले तरी त्यांना लसीकरणात प्राथमिकता देत नसल्याने स्वतः व त्यांचा परिवार चिंतित आहे, असा आरोप करून वेकोलीच्या कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून लसीकरणात प्राथमिकता देण्याची मागणी करण्यात आली. मागणीची तत्काळ दखल न घेतल्यास कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा चंद्रपूर व यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.