चंद्रपूर : गरिबांचा लाकूड समजल्या जाणारा बांबू अन्न, औषध, इमारत बांधकाम साहित्याचा पर्याय, हस्तव्यवसाय, फर्निचर, कृषी, निसर्ग पर्यटन, कागद निर्मिती प्रकल्प आदि क्षेत्रात मोठा बदल घडवून आणू शकतो. बांबूपासून तयार करण्यात येणा-या शोभेच्या वस्तूंची बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीचे बांबू सक्षम साधन असून बांबूमध्ये जिल्हाचे अर्थकारण बदलविण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर आणि बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली यांच्या वतीने चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधनी येथे जागतीक बांबू दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनरक्षक एन. आर. प्रविण यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर, उप वनरक्षक अरविंद मुंढे, दिपेंद्र मल्होत्रा, जी. गुरुप्रसाद, नंदकिशोर काळे, बांबू संशोधन केंद्राचे संचालक के.एम. अभर्णा, किशोर कोने आदि. मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, बांबू ही जगात सगळ्यात वेगाने वाढणारी बहुउपयोगी वनस्पती आहे. याचे फायदे जनजागृतीच्या माध्यमातून पोहविण्याची गरज आहे. चंद्रपूरातील जमीनही बांबू उत्पादनासाठी उपयुक्त आहे. त्यामूळे बांबुचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येईल या दिशेने वन विभागाने प्रयत्न करावेत. बांबू पासून तयार होणा-या वस्तुंच्या विक्रीकरीता बाजारपेठ उपलब्ध करावी, बांबू हा इतर झाडांपेक्षा ३५ टक्के अधिक ऑक्सिजन सोडते तर प्रति हेक्टर १२ टन कार्बन डाय ऑक्साईट वातावरणातून काढू शकते. ऊर्जा निर्मिती करिताही बांबूचा वापर केला जातो. बांबूवर आधारीत पारंपारीक व आधूनिक उद्योग निर्मिती करणा-या उदयोजकांना सवलत देण्यात यावी, शेतक-यांना मोठ्या प्रमाणात बांबू रोपट्याचा पूरवठा करण्यात यावा असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले. बाबू लागवडीला चालणा मिळावी या करीता अटल बांबू समृध्दी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतक-यांना मिळावा याकरिता संबंधित विभागाने अधिक परिश्रम घेण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. बांबूबाबत जागरुकता वाढावी याकरिता दरवर्षी जागतीक बांबू दिन मोठ्या प्रमाणात साजरा करावा असे आवाहणही त्यांनी यावेळी बोलतांना केले. या कार्यक्रमात बांबू लागवड करणा-या शेतक-यांचा सत्कार करण्यात आला.