चंद्रपूर : शहरात बाबुपेठ परिसरात स्वतंत्र पोलिस चौकी तातडीने सुरू करण्याची मागणी माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे . नुकतीच या परिसरात वैष्णवी आंबटकर या युवतीची निर्घृण हत्येची घटना घडली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. बाबुपेठ परिसरात अवैध व्यवसाय, गुंडगिरी, चो-या, अवैध दारूविक्री असे प्रकार राजरोसपणे सुरू आहे. मात्र पोलिस चौकशी अभावी या अवैध व्यवसायांवर प्रतिबंध घालण्यात पोलिस विभागाला अपयश येत असल्यामुळे या परिसरात पोलिस चौकी स्थापन करणे आवश्यक असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
या मागणी बाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गृहमंत्री , पोलिस अधीक्षक यांच्याशी तातडीने पत्रव्यवहार केला आहे. आज आ. मुनगंटीवार यांनी बाबुपेठ परिसरात मृतक वैष्णवी आंबटकर यांच्या परिवाराची भेट घेतली असता नागरिकांनी ही मागणी केली.
बाबुपेठ परिसरात यापूर्वी पोलिस चौकी उपलब्ध होती. मात्र सदर पोलिस चौकीची खोली जिर्ण व निकामी झाल्यामुळे ही पोलिस चौकशी बंद झाली आहे. त्यामुळे स्वतंत्र जागेत पोलिस चौकशी तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे असेही आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. अपर पोलिस अधीक्षक यांना दूरध्वनीद्वारे त्यांनी त्वरित सूचना देत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या.