अमरावतीच्या तीन व्यापाऱ्यांचा कार अपघातात मृत्यू

चंद्रपूर : आदिलाबाद येथून कारने अमरावतीकडे जात असताना यवतमाळच्या पारवानजीक अपघात झाला. रविवारी सकाळी ६ वाजता भरधाव कार झाडावर धडकली. यात चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी आहे. मृतासह जखमी हे एकाच कुटुंबातील असून आंब्याचे व्यापारी आहेत.

वाहन चालक विश्वनाथ बिहारी सेमलकर (३६) रा. अचलपूर जि. अमरावती, मोहंमद सलीम शेख हबीब (२५), असीम सिमाब मोहंमद सलीम (३०) दोघे रा. शिरसगाव कसबा ता. चांदूरबाजार, जि. अमरावती या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर मोहतासीम शादाब मोहंमद सलीम (३२) हा गंभीर जखमी आहे. आंब्याचे व्यापारी एमएच-४०-केआर-७३२५ क्रमांकाच्या कारने आदिलाबाद येथून अमरावतीकडे जात होते. पांढरकवडा मार्गावर पारवा गावाजवळ भरधाव कारने झाडाला धडक दिली. यात तिघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेतील सहायक निरीक्षक मुकुंद कवाडे, जमादार यशपाल ठाकूर, इम्रान पठाण, हेमंत अडेकर यांनी घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात कार चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला.