भिलाई स्‍टील प्लांट येथून १६ टन ऑक्‍सिजनचा टँकर नागपुरात पोहोचला

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात ऑक्सिजनसाठी हाहाकार उडाला असतानाच आज (सोमवार) नागपुरात ऑक्सिजनचा पहिला टँकर पोहोचल्याने दिलासा मिळाला आहे. छत्तीसगड येथील भिलाई स्टील प्लांट येथून १६ टन ऑक्सिजन नागपूरला मिळाला आहे.

कोरोना रूग्णांच्या उपचाराकरिता भिलाई स्टिल प्लांट येथून नागपुरला नियमित ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे. अलिकडेच वेळेवर ऑक्सिजन मिळाले नसल्याने नागपुरातील कामठी येथे चार रूग्णांचा मृत्यू झाला होता. तर घरीच क्वारंटाइन असलेल्या कोरोना रूग्णांवर उपचार करताना घरगुती रूग्‍णांना ऑक्सिजन मिळण्यात अडचणी येत आहेत.

या घटानांची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने घेतली. नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने टँकरच्या माध्यमातून १६ टन ऑक्सिजनची पहिली खेप ‘भिलाई स्टील प्लांट’मधून नागपूरला आज पोहोचली आहे. तसेच सोमवारी मध्यरात्रीपर्यंत भिलाई मधून दुसरी आणि बेल्लारी मधून एकूण ३६ टन अतिरिक्त ऑक्सिजन नागपूरला पोहोचणार आहे. नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या ऑक्सिजनचे रुग्णालयांना वितरण केले जाणार आहे. त्यामुळे तुर्तास नागपुर कराना दिलासा मिळाला आहे.