मागणी पाऊणे तिन लाखांची; मिळाले चौदा हजार डोस

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• लसीकरणासाठी काही केंद्र बंद राहणार
• कमी वतीने केंद्रावर होणार लसीकरणाला गर्दी

चंद्रपूर : ६० वर्षे, ४५ वर्षांवरील सहव्याधी आणि ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांंच्या लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने दोन लाख ७६ हजारांची मागणी केली होती; मात्र जिल्ह्याला केवळ १४ हजार डोस मिळाले. त्यामुळे लसीकरणासाठी काही केंद्र बंद ठेवावे लागणार असून, मंगळवारी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळणार आहे.
कोरोना बाधित व्यक्ती व मृतकांचीही संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे प्राधान्य गटातील नागरिकांनी प्रतिबंधक लस घेण्यासाठी नोंदणी करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने या आठवड्यात तब्बल २ लाख ७६ हजार डोसची मागणी केली होती; मात्र सोमवारी केवळ १४ हजार डोस मिळाल्याने काही केंद्र बंद ठेवावे लागणार आहेत. १ एप्रिलपासून जिल्ह्यात १०० पेक्षा जास्त केंद्र सुरू करण्यात आले. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अन्य एक अशा दोन केंद्रांचा अपवाद वगळल्यास सर्व केंद्रांमधून कोविशिल्ड लस देणे सुरू आहे. हेल्थ केअर, फ्रन्टलाइन वर्कर, ६० वर्षांवरील व सहव्याधीसह ४५ वर्षांवरील सर्वांनाच १ एप्रिलपासून लस घेण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे नागरिकांची गर्दी होऊ लागली, यासाठी प्रशासनाने केंद्रांची संख्या वाढविली; मात्र सोमवारी १४ हजार डोस मिळाल्याने लस टंचाई कायम राहणार आहे.

केंद्रातून परत येणाऱ्यांचा संताप
लसीकरण वेगाने व्हावे, यासाठी चंद्रपूर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने केंद्रांची संख्या वाढविली; मात्र मागणीप्रमाणे डोस मिळत नाहीत, त्यामुळे कोणतेही केंद्र सलग सात दिवस सुरू ठेवणे प्रशासनाला शक्य झाले नाही. लसीचा तुटवडा असल्याची कुणकुण लागल्यानंतर नागरिक सकाळपासूनच केंद्रावर गर्दी करतात; परंतु लस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उमटत आहे.

१८ वर्षांपुढील लसीकरणाचे काय होणार?
नागरिकांना नजीकच्या केंद्रांवर लस घेण्यासाठी तालुक्यात अनेक ठिकाणी केंद्र सुरू झाले. पण, हे केंद्र नावापुरतेच राहिले आहेत. आता केंद्र शासनाने १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील युवक-युवतींच्या लसीकरणाची घोषणा केली. मात्र, आधीच लोकांना लस अभावी परत जावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने वाढीव लसीची मागणी केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याला अत्यल्प पुरवठा का केला जातो, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.