19 कोरोना बाधित अधिकारी कर्मचा-यांवर उपचार सुरुच

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• 63 अधिकारी कर्मचारी झाले कोरोनामुक्त
• मृत्युमुखी पडलेल्या दोन कुटुंबीयांना प्रत्येकी ३० लाखांची सानुग्रह मदत

चंद्रपूर : मागील वर्षांपासून आतापर्यंत विज वितरण चंद्रपूर परिमंडळातील ८५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ६३ कोरोनामुक्त झाले तर तिघांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या तीनपैकी दोन जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३० लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली आहे. सद्यस्थितीत १९ अधिकारी व कर्मचारी रुग्णालय आणि घरी उपचार घेत आहेत.

कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत महावितरणचे अभियंता व कर्मचारी सुरळीत व अखंडित वीजपुरवठ्यासह विविध ग्राहकसेवा देत आहेत. मात्र, चंद्रपूर शहर तसेच ग्रामीण भागात महिनाभरापासून कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अनेक अधिकारी व कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबीयातील व्यक्तींना तातडीने आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी चंद्रपूर परिमंडळ कार्यालयात कोविड समन्वय कक्ष सुरू करण्यात आला आहे. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी योगेश गोरे हे कक्षप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. रुग्णलयांशी संपर्क साधून बेड उपलब्ध करून देणे तसेच प्लाझ्मा, औषध व इतर मदत उपलब्ध करून देण्यासाठी हा कक्ष कार्यरत आहे.
*कर्मचारी व कुटुंबासाठी समूह आरोग्यविमा*

महावितरणमधील सर्व कर्मचारी व कुटुंबातील सदस्यांसाठी समूह आरोग्यविमा काढण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आरोग्यसेवेबाबत काही अडचणी असल्यास महावितरणच्या कर्मचारी किंवा कार्यालयप्रमुखांनी थेट उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी गोरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे. अत्यावश्यक असलेल्या वीजक्षेत्रात ग्राहकसेवा देताना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात किंवा क्षेत्रीय काम करताना कोविड संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी व आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्य अभियंता देशपांडे यांनी दिले आहेत.