• लालपेठ भागातील एरीया हॉस्पीटल व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कोव्हॅक्सीन लसीकरण उपलब्ध
चंद्रपूर : अतिशय वेगाने संसर्ग पसरणाऱ्या कोव्हिड-१९ विषाणू सारख्या संकटाच्या काळात लस हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात एकूण १४ लसीकरण केंद्राच्या माध्यमातून एकूण ४१ हजार २१७ जणांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला. पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने सध्या शहरात केवळ दोन लसीकरण केंद्र सुरु आहेत. लालपेठ भागातील एरीया हॉस्पीटल व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहे.
कोरोना लसीकरणाची सुरुवात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली. २० एप्रिल पर्यंत ४१ हजार २१७ जणांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील ५ हजार ५६३ योद्धांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ५ हजार ३११ आरोग्य सेवकांना पहिला डोज, तर ३ हजार ३३९ जणांना दुसरा डोस देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलिस, महसूल व इतर अत्यावश्यक सेवेतील ३ हजार ५५३ कोरोना योद्धांची नोदणी करण्यात आली. यातील ३ हजार ५३२ जणांना पहिला डोज व १७७३ जणांना दुसरा डोज देण्यात आला. आरोग्य सेवक व फ्रंट लाईन वर्कर मिळून एकूण ९ हजार ११६ नोंदणीकृत लाभार्थ्यांना पहिला व दुसरा असे १३ हजार ९६५ डोज देण्यात आला.
तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिक व ६० वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याचे धोरण शासनातर्फे अवलंबण्यात आले. आतापर्यंत १८ हजार ८५६ ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोज, तर ८९० नागरिकांना दुसरा डोज देण्यात आला. तसेच ७ हजार ४०४ व्याधीग्रस्त नागरिकांना पहिला डोस, तर १०२ जणांना दुसरा डोज देण्यात आला. म्हणजेच एकूण ४१ हजार २१७ जणांनी पहिल्या आणि दुसऱ्या लसीचा डोस घेतला आहे. यात कोविशिल्ड ३६ हजार ३६३ तर, कोव्हॅक्सीन ४ हजार ८५४ जणांना देण्यात आली.
नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे :
महापौर राखी संजय कंचर्लावार
शहरात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नरत आहे. लसींचा मुबलक साठा उपलब्ध होताच मनपाचे एकूण १५ लसीकरण केंद्र सुरु करण्यात येतील. यातील १० केंद्रावर लसीचा पहिला डोस तर ५ केंद्रावर दुसरा डोस देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यात घ्यावा. प्रत्येक नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी तसेच लस घेतल्यानंतर लगेचच कोणताही निष्काळजीपणा न करता सतत मास्क वापरणे, हात धुणे व सहा फुटाचे अंतर ठेवून सोशल डिस्टंसिंगचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे.