अवैध दारू विक्रेत्यांचा सावली पोलिसावर हल्ला, तीन जखमी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• अटकेसाठी गेलेल्या पोलिस पथकावर ही दगडफेक
• सावली तालुक्यातील किसाननगर येथील घटना

चंद्रपूर : सावली तालुक्यातील किसान नगर येथील अवैध दारू विक्रेत्यांनी पोलिसावर हल्ला केल्याची घटना काल (दि. 21) चा रात्री 10 वाजता चे सुमारास घडली. या हल्ल्यात पोहवा पितांबर खरकाटे,नापोशी गणपत मट्टामी व पोशी दीपक डोंगरे असे तीन पोलीस जखमी झाले आहेत. सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशनला होतात आरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिस पथकाच्या वाहनांवर सुद्धा दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. जखमी पोलिसांना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.

मागील सहा वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. मात्र जिल्ह्यासह ग्रामीण भागात दारूबंदी नावापुरतीच उरली आहे. या दारूबंदी मुळे झटपट पैसा कमावण्याच्या नादात अनेक अवैध दारू विक्रेते निर्माण झाले आहेत. असाच प्रकार सावली तालुक्यात असून किसान नगर हे गाव अवैध मोहफुलाच्या दारूचे माहेरघर बनले आहे. काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास सावली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी किसाननगर येथे गस्तीवर गेले असता अज्ञात व्यक्ती दुचाकीवर मोहफुलाची अवैध दारू घेऊन जात असल्याचा संशय आल्याने त्याचा पाठलाग करून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान अवैध दारू विक्रेत्यांच्या नातेवाईकांनी अचानक पोलिसावर हल्ला चढविला व जखमी केले. सदरची माहिती पोलीस स्टेशनला होतात पोलीस पथक किसान नगर येथे रवाना झाले. परंतु पोलीस पथकाच्या वाहनावर सुद्धा किसान नगर येथील अवैध दारू विक्रेत्यांनी दगडफेक केल्याची माहिती आहे. सदर घटनेतील आरोपी पसार असून आरोपी विरुद्ध कलम 353, 323, 504, 506 व मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार शिरसाठ, उपनिरीक्षक चिचघरे करीत आहेत.

आमचे कर्मचारी गस्तीवर असताना किसान नगर येथे मोटरसायकलवर 15 लिटर ची संशयित कॉन दिसली असता त्याचा पाठलाग करून चौकशी करीत असतानाच गावातील अवैध दारु विक्रेत्यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोर फरार असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे – रोशन शिरसाट, ठाणेदार पोलीस स्टेशन सावली