निमकर जोपासत आहे नात्या पलिकडचा ऋणानुबंध

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

१८ वर्षांपासून आदिवासी बहिणींकडून रक्षाबंधन; खडकी व हिरापूर गावात आनंदोत्सव

चंद्रपूर : रक्षाबंधन हे बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण, नात्याला बंधन नसते, रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन जोपासले जाते ते खरे नाते असते असंच नातं माजी आमदार सुदर्शन निमकर हे मागील अठरा वर्षांपासून आदिवासी बहिनींसोबत निभवत आहे.

निमकर हे 2003 मध्ये आमदार असतांना रक्षाबंधनाच्या दिवशीच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जिवती तालुक्यातील आदिवासी खडकी व हिरापूर या गावांत गेले असता या दोन्ही गावतील आदिवासी भगिनींनी रक्षाबंधनाचे पवित्र नाते जोपासत कोणतीही पूर्वतयारी नसतांना खडकी येथील गोदाबाई भीमराव मडावी व हिरापूर येथील अंजनाबाई जंगु सोयाम यांनी निमकरांना राख्या बांधल्या. तेंव्हापासून निमकर हे सख्या बहिणीसारखं नातं जोपासत 18 वर्षांपासून अविरतपणे आपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊन आदिवासी भगिनीकडून राख्या बांधून त्यांना साळी चोळी भेट देऊन अभिनंदन करतात. यानिमित्तानं दोन्ही गावात बहीण भावाच्या ऋणानुबंधाच वातावरण निर्माण होऊन या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात सर्व महिला भगिनी व बांधव तसेच बालगोपाल सहभागी होत असल्यामुळे उत्सवाचं वातावरण निर्माण होत असते.

यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे सोबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, विमाशी संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक एस. बी. चंदंनखेडे, भोक्सापूर ग्रा. पं.चे उपसरपंच गोविंद मिटपल्ले, खडकी चे माजी सरपंच भीमराव पाटील मडावी वयोवृद्ध प्रतिष्ठित मारू पाटील गेडाम, सुभाष राठोड, नारायण जाधव, इमाम खान पठाण, जंगु पाटील सोयाम, पंढरी सलगर, तिरुपती पोले, पाटण येथील प्रभाकर पा. उईके, जयदेव आत्राम महाराज, सचिन उत्तरवार, सलमान खान पठाण सह मोठ्यासंख्येने नागरिक सहभागी झाले होते. याप्रसंगी खडकी येथील वयोवृद्ध आदिवासी समाजातील प्रतिष्ठित नागरिक मारू पा. गेडाम यांचा माजी आमदार निमकर यांनी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.