चंद्रपूर जिल्‍हा सामान्य रूग्‍णालयाला 15 एनआयव्‍ही आणि 2 मिनी व्‍हेंटीलेटर्स उपलब्‍ध :  आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• आ. मुनगंटीवार यांनी मानले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार

चंद्रपूर : जिल्‍हयातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यात आरोग्‍य यंत्रणा कमी पडत असताना, व्‍हेंटीलेटर व ऑक्सीजनचा तुटवडा भासत असताना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत केंद्रीय मंत्री व ज्‍येष्‍ठ भाजपा नेते नितीन गडकरी यांच्‍या सहकार्याने 15 एनआयव्‍ही अर्थात नॉन  इन्‍व्‍हासिव्‍ह व्‍हेंटीलेटर्स आणि 2 मिनी व्‍हेंटीलेटर्स जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालयातील रूग्‍णांसाठी उपलब्‍ध केले आहे.

दि. 23 एप्रील 2021 रोजी 15 एनआयव्‍ही आणि 2 मिनी व्‍हेंटीलेटर्स आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या उप‍स्थितीत जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. राठोड यांना सुपुर्द करण्‍यात आले. कोरोना रूग्‍णांची वाढती संख्‍या, वाढता म़त्‍युदर या चिंताजनक वातावरणात प्रामुख्‍याने  व्‍हेंटीलेटर्सची कमतरता, ऑक्‍सीजनचा तुटवडा आदी समस्‍यांनी भर घातली आहे. अनेक रूग्‍णांच्‍या नातेवाईकांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे तक्रारी केल्‍या असता आ. मुनगंटीवार यांनी तातडीने केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्‍याशी संपर्क साधला व व्‍हेंटीलेटर्स उपलब्‍ध होण्‍याबाबत विनंती केली.

ना. नितीनजी गडकरी यांनी सुध्‍दा तत्‍परतेने होकार देत यासंदर्भात तोडगा काढला. 15 नॉन इन्‍व्‍हासिव्‍ह व्‍हेंटीलेटर्स व दोन मिनी व्‍हेंटीलेटर्स तातडीने चंद्रपूरला रवाना केले. आज आ. मुनगंटीवार यांच्‍या प्रमुख उपस्‍थीतीत सदर व्‍हेंटीलेटर्स डॉ. राठोड यांना सुपुर्द केले. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, महानगर भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, राजेंद्र गांधी, स्‍थायी समिती सभापती रवी आसवानी, उपमहापौर राहुल पावडे, सौ. अंजली घोटेकर, सुभाष कासनगोट्टुवार, संजय कंचर्लावार, विशाल निंबाळकर, ब्रिजभुषण पाझारे, प्रकाश धारणे, रामकुमार आकापेल्‍लीवार, सुहास अलमस्‍त आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

या मदतीबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे. विकासकामे असो वा लोकहिताचे उपक्रम आम्‍ही केलेल्‍या मागणीची पुर्तता नितीनजी गडकरी नेहमी प्राधान्‍याने करीत आले आहेत. या संकटसमयी सुध्‍दा त्‍यांनी तत्‍परतेने केलेली मदत आमच्‍यासाठी लाखमोलाची असल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले.