• फिनिक्स साहित्य मंचाचा पुढाकार : कविंच्या कवितेतून प्रबोधन
चंद्रपूर : संपूर्ण जग कोरोना महामारीत सापडले आहे. देशात तिस-या लाटेची भीती आहे. त्यासाठी वेळीच उपाययोजना आखून व्यापक प्रमाणात जनजागृती गरजेची आहे. चंद्रपुरातील फिनिक्स साहित्य मंचाने जिल्ह्यातील प्रतिथयश कवींना कोरोना लसिकरणावर लिहिते करुन कविसंमेलनातून जनजागृतीचा संदेश दिला आहे. शासनाची महत्वपूर्ण मोहिम अधिक प्रभावी राबविल्या जावी, लोकांमध्ये मोहिमेची विशेष जनजागृत्ती व्हावी, या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील कवी, लेखकांच्या लेखनातून या मोहीमेचा विशेष प्रचार व प्रसार व्हावा, या हेतूने ऑनलाईन कविसंमेलन प्रसिद्ध युवा कवी व माह्यी परदेस वारीचे लेखक गोपाल शिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यात जिल्ह्यातील १९ कवींनी सहभागी होवून लसिकरणविषयी जनजागृतीचा संदेश दिला.
“लस आहे उपाय कोरोनावर ठोस
विश्वासाने टोचून घ्या सारे दोन्ही डोस”
उर्जानगरचे कवी सुरेंद्र इंगळे यांनी चला घेवू लस कवितेतून दोन्ही डोस घेण्याचा संदेश दिला. कवी धर्मेंद्र कन्नाके यांनी लसिकरणाचे महत्त्व पटवून दिले. गोंडपिपरीचे कवी संतोषकुमार उईके यांनी ‘जातील हे ही दिवस’ हा विश्र्वास दिला. तना मनावर साचलेली मृत्यूची दहशत दूर करण्यासाठी लसिकरणाशिवाय पर्याय नाही असे कवी नरेशकुमार बोरीकर यांनी ‘चल उठ यार’ कवितेतून फर्मान सोडले.
“कोरोनाला हरवायला
देशामधून पळवायला
कोरोनाची लस घ्या
निश्र्चित होवून जगायला”
कोरपनाचे कवी जयवंत वानखेडे यांनी ‘कोरोनाला हरवायचे’ या कवितेतून जगण्याविषयीचा आशावाद मांडला. लाॅकडाऊनमध्ये माणूस अनलाॅक व्हावा, ते लसिकरणानेच होईल अशी भावना कवी विजय वाटेकर यांनी व्यक्त केली. कवी अविनाश पोईनकर यांनी ‘पुन्हा श्र्वास घेण्यासाठी’ कवितेतून कोरोनामुळे झालेली भयावह वाताहत मांडली. वरोराचे कवी पंडीत लोंढे यांनी लस हेच सुरक्षा कवच असल्याचा संदेश दिला. कविसंमेलनाचे संयोजक व गोंडपिपरीचे सहायक गटविकास अधिकारी कवी धनंजय साळवे यांनी ‘मी विजय होणारच’ या कवितेतून लसिकरणाबाबत अंधश्रद्धा टाळा ही सकारात्मक भुमीका मांडली. घुग्गूसचे कवी राजेंद्र घोटकर यांची ‘कोव्हीड लसिकरण’ कवितेतून प्रबोधन केले. कवी मिलेश साकुरकर यांनी लसिकरणाबाबत कुठलीही भीती बाळगू नका हा विचार मांडला.
“लस घेतली म्हणून तू
मोकाट गावभर हिंडू नको
हात धूणं, मास्क लावणं
लोकांच्या गर्दीत जावू नको”
बल्लारपूरचे कवी सुनिल बावणे यांनी बोलीभाषेत कोव्हीड लसिकरणानंतरही काळजी घेण्याची सुचना कवितेतून केली. कवी अरुण घोरपडे यांनी अभंगातून लस सुरक्षीत असल्याचा संदेश दिला. कवी बी.सी.नगराळे यांनी लसिकरण काळाची गरज असल्याचे कवितेतून सांगितले. आनंदवनचे कवी नरेंद्र कन्नाके यांनी कोव्हीडशिल्ड, कोवॅक्सीन हे मानवासाठी ‘जीवनलस’ असल्याचा सूर छेडला. कवी राजेंद्र पोईनकर यांनी लसिकरणानंतर काहींना हलका ताप येतो पण आयुष्य सुरक्षित राहते असे मत मांडले. मानोराचे कवी सुधाकर कन्नाके यांनी लसिकरणाबाबत ग्रामीणांना शब्दातून साद दिली. भोयगावचे कवी संभाशीव गावंडे यांनी कोरोनाच्या गोंधळावर लसिकरण हाच उपाय असल्याची भुमीका मांडली. संमेलनाचे अध्यक्ष कवी गोपाल शिरपूरकर यांनी माझी जबाबदारी कवितेतून प्रत्येकांनी तातडीने लस घेण्याचे आवाहन केले. सुत्रसंचालन कवी नरेशकुमार बोरीकर तर आभार कवी सुरेंद्र इंगळे यांनी मानले. जिल्हा प्रशासनाला सदर कविता जनजागृतीसाठी देण्यात येईल असे फिनिक्स मंचातर्फे सहायक गटविकास अधिकारी व आयोजक कवी धनंजय साळवे यांनी सांगितले.
फोटो : सहभागी कविंना फिनिक्स तर्फे प्रमाणपत्र देताना सहायक गटविकास अधिकारी धनंजय साळवे