चंद्रपूर जिल्ह्यात  ‘जादुटोना भानामती’ च्या संशयावरुन एकाच कुटुंबातील सात जणांना जबर मारहाण

• भरचौकात हातपाय बांधून केली मारहाण
• पोलीस पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिंन्ह
• तेरा जणांवर गुन्हे दाखल, माहिती देण्यास कमालीची गुप्तता

चंद्रपूर : महाराष्ट्र तेलंगाना सिमेवर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या वणी खुर्द या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून काही गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. या घटनेत ७ जण जखमी झाले असून पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला कलंकित करणारी ही घटना शनिवारी घडली. या घटने मध्ये शांताबाई भगवान कांबळे (५३), साहेबराव एकनाथ हुके (४८), धम्मशिला सुधाकर हूके (३८), पंचफुला शिवराज हुके (५५), प्रयागबाई एकनाथ जबर जखमी झाले

पोलिसांनी काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केले असले तरी घटनेबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे. त्यामुळे दोन दिवस उलटूनही या गंभीर प्रकाराची कुठेही वाच्यता झाली नाही. किती लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कुणाला अटक करण्यात आली का, याबाबत काहीही माहिती देण्यास स्थानिक पोलिसांनी नकार दिला. गावाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला गावात प्रवेश करण्यास मज्जाव केला जात आहे. गावातील लोक काहीही बोलण्यास तयार नाहीत. मात्र, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गावातील दोन-तीन महिलांच्या अंगात देवी आल्या आणि त्यांनी दलित समाजातील वयाने ज्येष्ठ आठ-दहा लोकांची नावे घेऊन त्यांनी भानामती केल्याचे सांगितले. त्याला बळी पडून गावातील काही लोकांनी त्या सर्वांना भरचौकात खांबांना बांधून बेदम मारहाण केली. वृद्ध, महिलांनाही मारहाण करण्यात आली. हा प्रकार सुरू असताना गावातील इतर लोक मूक दर्शक बनले होते. भीतीने कुणीही मध्ये पडले नाही. मारहाण झालेले कुटुंब दलित असले तरी मारहाण करणान्यांमध्ये सर्वजातीय सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. गावाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे

भरचौकात दोरखंडाने बांधून जबर मारहाण

वणी खुर्द या गावात एका कुटुंबावर जादुटोणा करत असल्याबाबत संशय होता. यातून त्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसानी जाऊन त्यांना सोडविले. याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास सुरू आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पदाधिकायांच्या माध्यमातून .गावकन्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे.
◆ सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर

काही नागरिकांवर गुन्हे दाखल, कारवाई सुरू

शनिवारी वणी येथे ही घटना घडल्यानंतर लगेच त्या गावात शांततेबाबत बैठक घेण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष दिले जात आहे. काही नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
◆संतोष अंबिके, सहायक पोलीस निरीक्षक, जिवती