‘जादुटोना भानामती’ प्रकरणी मारहाण करणा-या तेरा आरोपींना अटक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• उर्वरित आरोपींचा शोध सुरू
• पाचच जणांवर उपचार सुरू, दोन किरकोळ जखमींना सुटी

चंद्रपूर : जिल्ह्यातील जिवती तालुक्यात जादुटोना भानामती’ प्रकरणी मारहाण करणा-या आरोपीवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत 13 आरोपींना अटक केली आहे तर घटनेत सात जण जखमी झाले होते त्यापैकी दोघांना किरकोळ जखम असल्याने जिवती येथेच उपचार करून घरी पाठविले आहे. पाच जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील पहाडी भागातील जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावात शनिवारी माणुसकीला कलंकित करणारी घटना समोर आली आहे.
गावातील काही कुटुंब जादूटोणा करतात असा संशय नागरिकांना होता, मोहरम च्या सवारी दरम्यान काही महिलांच्या अंगात भानामती आली असल्याचा प्रकार घडला. त्यांनी गावातील हुके व कांबळे कुटुंब हे जादूटोणा करतात असे सांगितले व लगेच अन्य दलित कुटुंबातील सदस्यांनी अन्य लोकांच्या मदतीने कसलाही विचार न करता त्या कुटुंबियातील सदस्यांना बांधून मारहाण केली.

इतकेच नव्हे तर त्या सर्वांना भर चौकात लाथा बुक्क्यांनी अमानुषपणे मारझोड केली, ह्याप्रकरणाची माहिती जिवती पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिवती पोलीस स्टे. येथील कर्मचारी घटनेत जखमी झालेला नागरिकांना ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या मारहाणीत 7 जण जखमी झाले असून ज्यामध्ये शांताबाई कांबळे (53), शिवराज कांबळे (74), साहेबराव हुके (48), धम्मशीला हुके (38), पंचफुला हुके (55), प्रयागबाई हुके (64), एकनाथ हुके (70) यांचा समावेश आहे.
पोलिस वेळीच गावात पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला असून पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांनी आरोपीवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. आरोपींमध्ये सुग्रीव रामाराव शिंदे,दत्ता कांबळे,प्रकाश कोटंबे,बालाजी कांबळे,दादाराव कोटंबे,अमोल शिंदे,गोविंद संभाजी येरेकर,केशव श्रावण कांबळे,माधव तेलंगे,दत्ता शिवाजी भालेराव,सुरज कांबळे, सिध्देश्वर शिंदे, संतोष पांचाळ यांचा समावेश आहे. आदी तेरा जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागिय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली जिवती सहा पोलिस निरिक्षक संतोष अंबिके करित आहे.

नागारिकांनी कुठल्याही अंधश्रध्देवर विश्वास ठेऊ नये

गावात सध्या शांततेच वातावरण आहे.तपासअंती निष्पन्न झालेल्या 13 जणांना ताब्यात घेतले आहे.उर्वरीत आरोपींसाठी तपास सुरू आहे. गावातील नागारिकांनी कुठल्याही अंधश्रध्देवर विश्वास ठेऊ नये असे काही आढळून आल्यास पोलिसांना तातडीने कळवावे.
: सुशिलकुमार नायक, उपविभागिय पोलिस अधिकारी, गडचांदूर