• लाॅकडाऊन मध्ये दारू दुकाने बंद असल्याने पीत होते सॅनिटायझर
• यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील खळबळजनक घटना
यवतमाळ : जिल्ह्यातील वणी येथे सॅनिटायझर प्राशन केल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. काल शुक्रवारी संध्याकाळी शहरातील 2 व्यक्तींचा तर रात्रीच्या सुमारास आणखी चौघांचा मृत्यू झाला आहे. यांचा सर्व व्यक्तींचा मृत्यू सॅनिटायझर पिऊन झाल्याचा संशय आहे. मृतकांमध्ये दत्ता कवडू लांजेवार (47) मु.तेली फैल वणी, नुतन देवराव पाटणकर रा, ग्रामीण रुग्णालय जवळ वणी, संतोष उर्फ बालू मेहर (35) रा. एकता नगर, विजय बावणे रा. वणी असे मृतकांचे नाव आहेत. काल संध्याकाळी सुनील महादेव ढेंगळे व गणेश उत्तम शेलार या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळातच दत्ता लांजेवार याचा मृत्यू झाला. तर पहाटे आणखी तिघांचा घरीच मृत्यू झाला.
मृत्यू झालेल्या व्यक्तींनी सोबतच नशा केली असल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या 24 तासांमध्ये 7 व्यक्तींचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीवरून, दत्ता लांजेवार, नुतन पाटणकर, संतोष उर्फ बालू मेहर, विजय बावणे, सुनील ढेंगळे, गणेश शेलार,दत्ता लांजेवार हे मजुरी करून उदरनिर्वाह करायचे. त्यांना मद्य प्राशनाची सवय होती. लॉकडाऊनच्या काळात दारूची विक्री बंद झाल्याने यांनी पिण्यासाठी 5 लीटरची सॅनिटायझरची कॅन विकत घेतली. दरम्यान त्यांनी सॅनिटायझरचे सेवन केले. त्यानंतर एकाएकाची तब्येत बिघडू लागली. दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी सुनील ढेंगळे, गणेश शेलार व दत्ता कवडू लांजेवार यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे नूतन देवराव पाटणकर याला अस्वस्थ वाटल्याने तो ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. मात्र तिथून तो उपचार न घेताच निघून आला. त्याचा पहाटे घरीच मृत्यू झाला. संतोष उर्फ बालू मेहर (35) व विजय बावणे हे मजुरी करायचे. बालू हा आधी पुण्यात मजुरीचे काम करायचा मात्र दोन तीन वर्षांआधी तो वणीत परत आला. बालू याचा पहाटे साडे तीन वाजताच्या दरम्यान घरी मृत्यू झाला. तर विजयचा देखील रात्रीच घरी मृत्यू झाला. सुनील ढेंगळे आणि दत्ता लांजेवार यांचा मृतदेहाचे पोस्ट मॉर्टम सुरु आहे. या दोघांचा मृत्यू सॅनिटायझर पिल्याने झाल्याची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
सर्वांनी एकत्रच केले सॅनिटायझरचे सेवन
या सर्वांचा गृप असल्याची माहिती आहे. सात मृतकांव्यतिरिक्त यात आणखी 3-4 व्यक्ती असल्याची माहिती आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना दारू मिळत नसल्याने त्यांनी सॅनिटायझर पिण्यास सुरूवात केली होती. दोन दिवसांआधी यांनी नशा करण्यासाठी 5 लीटरची सॅनिटायझरची कॅन विकत घेतल्याची माहिती आहे. कॅन विकत घेऊन त्यांनी एकत्रच सॅनिटायझरचे सेवन केल्याचा संशय आहे. यातील सात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यांच्यासोबत आणखी किती लोकांनी सॅनिटायझरचे सेवन केले हे तपासात उघड होणार. यातील केवळ दोघांच्या मृत्यूची सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाल्याची नोंद आहे.
केवळ दोघांचे पोस्टमॉर्टम
काल संध्याकाळपासून एकेकाची तब्येत बिघडायला सुरुवात झाली. संध्याकाळी सुनील ढेंगळे व दत्ता लांजेवार व गणेश शेलार यांचा एकापाठोपाठ मृत्यू झाला. त्यामुळे भीतीने यातील तिघे दवाखान्यात गेलेच नाही व घरीच त्यांचा मृत्यू झाला. गणेश शेलार यांच्या मृतदेह पोस्टमार्टम न करता कुटुंबीय घेऊन गेले. पोस्टमार्टम करणार नाही असे दवाखान्यात लिहून दिले. सुनील ढेंगले आणि लांजेवार यांच्या मृतदेहावर पोस्टमार्टम सुरू आहे. तर इतर 3 जण घरीच मरण पावल्यामुळे त्यांची दवाखान्यात किंवा पोलिस ठाण्यात नोंद नाही. चोवीस तासांच्या आत 7 जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.