पहिली ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ नागपुरात दाखल

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो आहे. अशावेळी रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेत रेल्वेद्वारे अन्य राज्यांमधून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

विशाखापट्टणम स्टील प्लॅट सायडींगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या 7 (एलएमओ) टँकर्ससह रो-रो सेवेद्वारे ऑक्सिजन एक्सप्रेस आज सायंकाळी, 8.10 वाजता महाराष्ट्रातील नागपूर स्थानकात दाखल झाली. नागपूर स्थानकात 3 टँकर उतरविण्यात येणार असून उर्वरित टँकर नाशिक रोड स्थानकात उतरविण्यात येणार आहेत.

गेल्या वर्षीही लॉकडाऊनमध्ये रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आणि पुरवठा साखळी कायम ठेवली. यंदादेखील रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्राची सेवा सुरू ठेवली आहे. दरम्यान, ऑक्सिजन एक्सप्रेस राज्यात दाखल झाल्यामुळे राज्याला दिलासा मिळाला आहे.

5 दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजन उपलब्ध होणार

या एक्स्प्रेसच्या माध्यमातून येत्या 5 दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेवाहतुकीच्या माध्यमातून राज्याला होणार आहे. ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सुचवल्याप्रमाणे राज्याच्या प्रशासनाने वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत रेल्वे मार्गे ऑक्सिजन वाहतूक करता येईल असं केंद्र शासनाला सुचवलं होतं. त्यानुसार ही एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेने मंजुरी दिली. यापुढील काळात ऑक्सिजनच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणे शक्य होणार आहे.

राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे ऑक्सिजनची मागणी केली. त्यानंतर रेल्वेकडून खास ऑक्सिजन एक्सप्रेस देण्यात आली आहे. महाराष्ट्राला विशाखापट्टणम, जमशेदपूर, राऊरकेला आणि बोकारो इथून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.