शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या बॅचचे विद्यार्थी ठरले कोरोनाबाधितांसाठी देवदूत

• २० डॉक्टरांची कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्ती

चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातून एमबीबीएसची वैद्यकीय पदवी घेऊन बाहेर पडलेल्या पहिल्याच बॅचचे २० डॉक्टर करोनाबाधित रुग्णांसाठी अक्षरशः देवदुतासारखे धावून आले आहेत. आजच्या कठीण प्रसंगी जिथे डॉक्टर, फिजिशियन, भूलतज्ज्ञ वैद्यकीय सेवा देण्यास टाळाटाळ करीत आहेत तिथे या तरुण डॉक्टरांनी सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. या सर्व २० डॉक्टरांची कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदावर सहा महिन्यांसाठी प्रत्येकी एक लाख रुपये व ४ भूलतज्ज्ञांची २ लाख रुपये महिना पगारावर नियुक्ती केली आहे.

या जिल्ह्यात कोरोना संक्रमण इतक्या वेगाने होत आहे की, दररोज १५०० बाधित आणि २५ ते ३० जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा अक्षरशः हादरली आहे. आजघडीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तीन ते चार फिजिशियन व दोन भूलतज्ज्ञ आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या या सर्व बाधित रुग्णांची जबाबदारी आहे. डॉक्टरांना १८ ते २० तास सेवा द्यावी लागत आहे.