जागा निश्चीतीचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे सादर – मनपा आयुक्तांची माहिती
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली ऑनलाईन आढावा बैठक
चंद्रपूर : कोरोनाची तिसरी संभाव्य लाट आणि त्यात लहान मुलांना प्रामुख्याने धोका संभावणार असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. कृती दलाने सुध्दा ही भिती व्यक्त केली आहे. यादृष्टीने प्रभावी उपाययोजना म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने सर्व सुविधांनी युक्त असे शिशु रूग्णालय उभारावे अशी अपेक्षा आपण मनपाच्या आसरा कोविड रूग्णालयाच्या उदघाटन समारंभात व्यक्त केली होती. यादृष्टीने मनपा प्रशासनाने आवश्यक तयारी करावी, यासाठी पीएम केअर, सीएम केअर तसेच वेकोलि व अन्य कंपन्यांच्या सीएसआर च्या माध्यमातुन निधी उभारण्याची सुचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
दिनांक २४ मे रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शिशु रूग्णालयाच्या उभारणीसाठी ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्थायी समिती सभापती रवि आसवानी, संदीप आवारी, मनपा आयुक्त राजेश मोहीते, सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, कार्यकारी अभियंता अ. र. भास्करवार, उपायुक्त श्री. वाघ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या शिशु रूग्णालयाच्या उभारणीच्या दृष्टीने जागा निश्चीती करण्याच्या व अंदाजपत्रक करण्याच्या दृष्टीने त्वरीत कार्यवाही करण्याच्या सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या. यासाठी जागा मोठी असावी, त्यानजिक बालांसाठी एक गार्डन तयार करण्यात यावे, बोलक्या भिंतींसह, बालकांसाठी आनंद देणा-या गोष्टींचा अंतर्भाव त्याठिकाणी असावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. साधारणतः १५ ते २० कोटी रू. निधी उभारण्याची आवश्यकता असून यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले. भारत सरकारच्या कामगार विभागाच्या माध्यमातुनही यासाठी मदत घेता येवू शकते, असेही ते म्हणाले.
यावेळी महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी आ. मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार शिशु रूग्णालय उभारणीच्या दृष्टीने मनपा प्रशासन सर्वशक्तीनिशी कार्य करेल असे सांगीतले. मनपा आयुक्त राजेश मोहीते यांनी आसरा कोविड रूग्णालयाच्या शेजारी असलेली जागा तसेच सराई मार्केटमधील जागा यापैकी एक जागा या शिशु रूग्णालयासाठी उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिका-यांकडे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती दिली. जागा निश्चीती झाल्यानंतर पुढील कार्यवाही वेगाने करू, असेही ते म्हणाले.
जागा निश्चीतीचा प्रस्ताव तहसिलदारांमार्फत भुमी अभिलेख विभागाकडे गेला असून प्रस्ताव प्राप्त होताच जागा मंजूरीबाबत कार्यवाही करण्यात येईल व शिशु रूग्णालयाच्या उभारणीसाठी त्वरेने कार्यवाही करू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली. तिस-या संभाव्य लाटेत लहान मुलांना संभावणारा धोका लक्षात घेता ही संकल्पना अतिशय उत्तम असून यासाठी बालरोग तज्ञांची उत्तम चमू आवश्यक असल्याचे मत जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी व्यक्त केले. याठिकाणी पेड्रीयाटीक व्हेटीलेटर्स व अन्य आवश्यक उपकरणे सुध्दा उपलब्ध होण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली. यावेळी आ. मुनगंटीवार यांनी अधिक्षक अभियंता साखरवाडे यांना जागेची पाहणी करून शिशु रूग्णालयाच्या बांधकामाचे संकल्पचित्र तयार करण्याचे निर्देश दिले. कोरोनाचा प्रकोप हा अल्पकाळात संपेल असे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे दिर्घकालीन उपाययोजना म्हणून चंद्रपूर मनपाचे हे शिशु रूग्णालय शिशुंसाठी सर्व सोयींनी, आवश्यक यंत्र सामुग्रींनी उपयुक्त असे आरोग्य कवच ठरावे असे प्रतिपादन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.