बुलडाण्याच्या खामगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेक खाजगी रुग्णालये रुग्णांची लूटमार करत असल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. तसेच काही ठिकाणी रुग्णालयांमध्ये भरण्यास पैसे नसल्याने मृतदेह देखील नातेवाईकांना देण्यात आलेले नाहीत.
बुलडाण्यामधील खामगाव येथील एका खाजगी रुग्णालयाने बिलामध्ये अवघे 11 हजार रुपये कमी पडत असल्याने रुग्णाच्या पत्नीचं थेट मंगळसूत्र ठेवून घेतल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे.
पत्नीने पैसे नसल्याचं बोलून दाखवलं. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना धमकावत पूर्ण पैसे भरल्याशिवाय रुग्णाला आम्ही सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने संबंधित रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र मागितलं व रुग्णाला घेऊन जायचं असल्यास मंगळसूत्र जमा करावं लागेल, असं सांगितलं. नाईलाजाने त्या हतबल पत्नीने आपलं मंगळसूत्र रूग्णालयात जमा केलं आणि आपल्या पतीला घेऊन घरी परतली. अशा अमानवी कृत्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच खामगावमधील संबंधित खाजगी रुग्णालयावर तात्काळ कारवाई करावी, अशी देखील मागणी सामान्यातून केली जात आहे.