मुंबई : गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्र राज्यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. हा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. सुरुवातीला राज्य सरकारनं 15 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला.
त्यानंतर 1 जून 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. 1 जून सकाळी सात वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. आता प्रश्न उपस्थित होतोय तो 1 जूननंतर लॉकडाऊन असेल की नसेल.
दरम्यान, ज्या जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णसंख्या कमी आणि मृतांचा आकडा कमी असेल त्या-त्या जिल्ह्यांमध्ये 1 जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल (रविवार) सांगितलं. तसेच निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, 1 जून 2021 नंतर ठाकरे सरकार लॉकडाऊन उठवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करेल. यावेळी राज्यसरकार चार टप्प्यात अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडली जातील. गेल्या काही दिवसांत दुकाने बंद असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी पहिल्या टप्प्यात हे सर्व व्यवहार सुरु करण्यावर सरकार भर देण्याची शक्यता आहे.
तर तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंटस, बार सुरु करण्यात येतील. त्यानंतर चौथ्या टप्प्यात सरकारकडून लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरु केली जातील. याच काळात जिल्हाबंदी कधी उठवायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे.