तुमचा जिल्हा रेड झोनमध्ये तर नाही ना?; जाणून घ्या एका क्लिकवर

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील लाॅकडाऊन सलग दोन वेळा वाढवल्यानंतर 1 जूननंतरही महाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का? असा प्रश्न उपस्थित झाला असतानाच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रातील 14 रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये शिथिलता आणता येणार नाही, असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. तसेच रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये कंटेंन्मेंट झोन तयार करून नियम आणखी कडक करावे लागतील, असं देखील त्यांनी बोलून दाखवलं. रेड झोनमधील 14 जिल्हे नेमके कोणते आहेत ते पाहूया-

महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले आणि दररोज रुग्णसंख्येत वाढ होत असलेले 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड, वाशिम, अकोला, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, सांगली, बुलढाणा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि उस्मानाबाद हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांना 1 जून नंतर लाॅकडाऊनमध्ये शिथीलता मिळण्याची शक्यता कमीच असल्याचं दिसून येत आहे.

महाराष्ट्रात 1 जूननंतर लॉकडाऊनची परिस्थिती नेमकी काय असणार? हे येत्या 4 ते 5 दिवसात कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता सरकार निर्णय घेईल, असं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवलं आहे. तसेच रेड झोनमधील जिल्ह्यांना कडक लाॅकडाऊन गरजेचा आहे आणि लोकांना संस्थात्मक विलगीकरण सक्तीचं केलं पाहिजे. त्यामुळे कुटुंबाच्या कुटुंब कोरोनाबाधित होण्यापासून वाचतील, असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे.