कोरपना : तालुक्यातील पिपरी ( नारंडा ) येथील नाल्याच्या डोहात बुडून बैल जोडी मृत पावल्याची घटना गुरुवार दिनांक २५ ला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, पिपरी येथील राजू आंबेकर हे आपली बैलबंडी घेऊन नाल्यात बैल धुण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान बैल जोडी खोल पाण्यात गेल्याने त्यांच्या बैलजोडीचा मृत्यू झाला. आंबेकर यांना बैल जोडी बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून बैलबंडी वरून उडी घेत स्वतःचे कसे बसे प्राण वाचले.तसेच बैलबंडी मागे बांधून असलेल्या बैलाने दाव तोडल्याने त्याही बैलाचे सुदैवाने प्राण वाचले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.