चंद्रपूर : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा माजी सांस्कृतिक कार्य व पर्यावरणमंत्री संजयबाबू देवतळे, यांचे आज नागपूर येथे उपचारा दरम्यान कोरोनाने निधन झाले. सर्व प्रथम पत्नी आणि मुलगा हे पॉझिटिव्ह आल्याने ते घरीच क्वारंनटाईन होते. त्यानंतर संजय देवतळे हे पॉझिटीव्ह झाल्याने त्यांना दहा ते बारा दिवसापासून नागपूर येथे शक्करदरा येथील श्री हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले होते. त्यांची प्रकृती काही दिवसात स्थिर होती. आज अचानक प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सच्चा आदर्श व्यक्तीमत्व हरपल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
■● राजकिय कारकीर्द ●■
माजी मंत्री संजय वामनराव देवतळे यांच्या राजकीय कारकिर्दीला 1992 मध्ये मार्डी – नागरी जि प क्षेत्रातील निवडणुकीपासून सुरुवात झाली. सर्वप्रथम ते या वर्षात जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आणि पुढे यांची राजकीय कारकीर्द राजकारणात वाढत गेली. सर्वप्रथम 1995 मध्ये विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली. यामध्ये बाबासाहेब वासाडे यांचा पराभव करून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामचंद्र उपाख्य दादासाहेब देवतळे यांचा वरोरा हा हक्काचा मतदारसंघ. त्यांचे पुत्र डॉ. विजय देवतळे शिक्षणासाठी परदेशी राहत असल्याने त्यांच्या निधनानंतर दादासाहेबांचे पुतणे संजय देवतळे त्यांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे आले. वरोरा मतदारसंघावर हक्क प्रस्थापित केला. संजय देवतळे यांचा वरोरा हा गड राहिला. गेल्या २० वर्षांपासून त्यांनी या मतदारसंघात दबदबा कायम ठेवला होता. या मतदारसंघाच्या माध्यमातून आमदार आणि मंत्रिपदही मिळविले.
काँग्रेसने विधानसभेसाठी ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य व पर्यावरणमंत्री संजय देवतळे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. निवडणूक लढली. पण, घरातच लढा द्यावा लागल्याने त्यांचा पराभव झाला.
भद्रावती येथील ग्रामउद्योग कार्यक्रमासाठी नितीन गडकरी आले होते. त्या कार्यक्रमानंतर उमरेड मार्ग ते बेला येथे जात असताना संजय देवतळे यांच्याकडे चहापानासाठी आले. यावेळी त्यांनी संजय देवतळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली व भाजपमध्ये यावे व आपण जोमाने काम करावे, अशी सूचना केली. त्यानंतर लगेच भाजपामध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला.
यावेळी भाजपा नेते बाबासाहेब भागडे नगराध्यक्ष अहेतेशाम अली, अन्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वरोडा विधानसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीमध्ये भाजपला जागा निश्चित मिळेल अशी शक्यता असताना ऐनवेळी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार संजय देवतळे यांना धनुष्यबाण हातात घेऊन विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
■● शोक संवेदना ●■
◆ शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत नेता हरपला : आ. सुधीर मुनगंटीवार
राज्याचे माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत नेता हरपल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
विधानसभा सदस्य म्हणुन त्यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आहे. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्न विधानसभाग़हात मांडणारा अभ्यासु लोकप्रतिनिधी म्हणुन त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्हयाच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
◆ अत्यंत लोकप्रिय निष्कलंक राजकीय जीवन जगनारे विश्वासु व जिव्हाळ्याचा मित्र गमावला : पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर
अत्यंत लोकप्रिय निष्कलंक राजकीय जीवन जगनारे, गेली ७ – ८ वर्षांपासून फार जवळीक असणारे विश्वासु व जिव्हाळ्याचे मित्र सहकारी च्या रूपात संजय देवतळे गेल्याने अतीव दुःख झाले. हि न भरून निघणारी हानी आहे, नेहमीच स्मरणात राहील असं व्यक्तिमत्व आम्ही गमावल अशी भावपूर्ण प्रतिक्रिया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पूर्व पालकमंत्री तसेच भाजपचे जेष्ठ नेते संजय देवतळे यांच्या निधन वार्ता नंतर दिली आहे.
वरोरा विधानसभेत त्यांनी केलेली जनसेवा हि सदैवच तेथील नागरिकांच्या व सर्व नेत्यांच्या स्मरणात असेल. त्यांच्यासारखा नेता हा वरोरा विधानसभेत दुसरा होणे नाही अशी त्यांनी या विधानसभेतील नागरिकांच्या मनात छाप सोडलेली आहे. आमदार ते राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हा त्यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे असे यावेळी हंसराज अहीर यांनी सांगितले.
◆ प्रसिध्दीपराडमूख नेत्यास समाज मुकला : आ. किशोर जोरगेवार
अतिषय शांत स्वभावाने सा-यांनाच आपलेसे वाटणारा प्रसिध्दीपराडमुख नेत्यास समाज मुकला असल्याची शोकसंवदेना राज्याचे माजीमंत्री संजय देवतळे यांच्या निधनानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
सलग चार वेळा वरोरा – भद्रावती विधानसभेचे नेतृत्व त्यांनी केले. या काळात त्यांनी आपल्या शांत स्वभावाने कार्यकर्ते जोडत संघटन बळकट केले. त्यांच्या नेतृत्वात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेवर पक्षांचा झेंडा फडकविला. काॅंग्रेस सरकारच्या काळात त्यांच्यावर कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. ती ही त्यांनी उत्तम रित्या पेलली. आज त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्राचे मोठे नूकसान झाले आहे.