यवतमाळ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे कोरोना रुग्णाचा मृतदेह समजून पोटदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा खळबळजनक प्रकार आज शनिवारी उघडकीस आला. रोशन भीमराव ढोकणे (वय २५, रा. पिपळगाव काळे ता. नेर) असे मृत युवकाचे नाव आहे. रोशनला मंगळवारी सकाळी पोटदुखीच्या असह्य त्रासामुळे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतदेहाची खातरजमा करून नातेवाईक गावी निघून गेले.
यानंतर रोशन भीमराव ढोकणे याच्या मृतदेहावर मारोती दासू जाधव या नावाने डेथ लेबल लाऊन मृतदेह शवविच्छेदनगृहात नेण्यात आला. दुसऱ्या दिवशी मृतक मारोती जाधव यांचा मुलगा विनोद जाधव आला. त्याची मनस्थिती बरी नसल्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्याच्यावेळी त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे मारोती जाधव यांच्या जागी रोशन ढोकणे याच्या मृतदेहाचा अंतिमसंस्कार यवतमाळ नगर परिषदेमार्फत 21 एप्रिल रोजी करण्यात आला.
मारोती जाधव कोरोना पॉझेटिव्ह होते. तसेच मॅरच्युरीमध्ये आणखी एक पुरुष मृतदेह होता. हा मृतदेह कोणाचा असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला. त्यातच चार दिवसांपासून रोशनचा मृतदेह बेपत्ता असल्याने नातेवाईक पोलिसात तक्रार देऊन उपोषणाला बसले होते. त्यामुळे मृत मारोती जाधव यांच्या नातेवाईकांना पुन्हा बोलविण्यात आले.
आज शनिवारी त्यांनी मृतदेहाची ओळख मारोती जाधव म्हणून केली आणि आज ख-या मारोती जाधव यांच्या मृतदेहाचे अंतिमसंस्कार नगर परिषदेमार्फत करण्यात आले. संपूर्ण वस्तुस्थिती रोशन ढोकणे यांच्या कुटुंबियांना समजावून सांगण्यात आली. तसेच त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली असता त्यांनी ती मान्य केली.
संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी समितीचा अहवाल मंगळवापर्यंत सादर होण्याची शक्यता असून संबंधित दोषीवर योग्य कारवाई करण्यात येईल.
– डॉ. मिलिंद कांबळे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ