नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रतिष्ठानांकडून २५ हजाराचा दंड वसूल

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
चंद्रपूर : कोरोना काळात सर्वांनी नियमांचे पालन करा, असे आवाहन मनपातर्फे वारंवार करण्यात येत आहे. तरी सुद्धा शहरातील काही प्रतिष्ठाने तसेच नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. आशा प्रतिष्ठानांवर सोमवारी (ता. २४) मनपाने कारवाई करून २५ हजाराचा दंड वसूल केला. तसेच शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवरही कारवाई करून ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. २ चे सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, मुख्य स्वच्छता निरीक्षक भुपेश गोठे, सुरक्षा अधिकारी राहुल पंचभुते व त्यांची चमू तसेच झोन क्र. २ चे कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. 

झोन क्र. २ अंतर्गत कोव्हीड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत ठक्कर दुकान, नितीन ठक्कर, आणि इमाम पान सेंटर यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन एकुण २५ हजारांचा तसेच मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून ३ हजार असे एकूण २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यापुढेही नियमांचे उल्लंघन केल्यास प्रसंगी प्रतिष्ठान सील करण्यात येईल, अशी ताकीद मनपाकडून देण्यात आली.