चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध दारू तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासन करीत आहे.
याच पार्श्वभूमीवर 25 मे ला स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी संजय आतकुलवार यांनी गुप्त माहितीच्या आधारे गडचांदूर शहरात ट्रक मध्ये देशी दारूचा अवैध साठा पकडला. सदर साठ्याची किंमत 20 लाख 48 हजार 400 रुपये असून या गुन्ह्यात आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.
गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी गडचांदूर येथील रेल्वे फाटक समोरील राजुरा जाणाऱ्या मार्गावरील सना पेट्रोल पंप समोर 12 चाकी ट्रक क्रमांक एमएच 29 बीई 2289 उभा होता, पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या वाहनांची चौकशी केली असता त्यामध्ये देशी दारूच्या 192 निपा किंमत 38 हजार 400 रुपये, देशी संत्रा दारूच्या 3 हजार 100 निपा किंमत 3 लाख 10 हजार रुपये व वाहन सहित एकूण 20 लाख 48 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ट्रक चालक मालक यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, नितीन रायपुरे, संजय वाढई, गोपाळ आतकुलवार व कुंदनसिंग यांनी यशस्वीपणे पार पाडली.