कोरोनालसीचे दोन डोज घेणा-यांना दाबेलीवर 15 टक्क्यांची सूट तर रक्तदात्यांना मोफत

दाबेली विक्रेत्या महिलेचा लसीकरण जनजागृतीसाठी सामाजिक उपक्रम

चंद्रपूर : कोरोना लसीकरणाच्या जनजागृतीसाठी विविध स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. अशातच चंद्रपुरात एका दाबेली विक्रेत्या महिलेने सामाजिक दायित्व म्हणून लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे. ज्याने कोरोना लसीचे दोन डोज घेतले, त्यांना दाबेलीच्या किमतीत 15 टक्क्यांची सूट दिली आहे तर रक्तदान करणा-या दात्यांना दाबेली मोफत वितरीत करण्यात येत आहे. हा सामाजिक उपक्रम चंद्रपुरातील लक्ष्मी दाबेली सेंटर मध्ये राबविल्या जातो आहे.

चंद्रपूरच्या श्रीकृष्ण टॉकीजलगत हे दाबेली उपहार गृह शहा दाम्पत्य चालवते. त्यांचे छोटेसे दुकान आहे. आर्थिक स्थिती जेमतेम असली, तरी समाजात जनजागृतीसाठी आपणही खारीचा वाटा उचलून सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावला पाहिजे, या विचाराने त्यांनी हा अनोखा प्रयोग सुरू केल्याचे लक्ष्मी शहा सांगतात. प्रलोभनातून प्रोत्साहन असे या उपक्रमाचे स्वरूप आहे आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

दाबेली हे खाद्य मोठ्या आवडीने खाल्ले जाते. त्यात जर टेस्ट हटके असेल तर खवय्ये अशा ठिकाणी हमखास जातात. लक्ष्मी दाबेली अशाच हटके टेस्टसाठी प्रसिद्ध आहे. आतातर इथे 15 टक्क्यांची सूट देण्यात आली, त्यामुळे ग्राहकांची पावले आपसूकच तिकडे वळू लागली आहेत. लसीकरणासाठी एखाद्या छोट्या व्यावसायिकाने घेतलेला हा पुढाकार आता कौतुकाचा विषय ठरला आहे.