यापुढे प्लास्टिक वापर करताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करणार – मुख्याधिकारी अर्शिया जुही

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

शहरातील २२ दुकानदारांकडून प्लास्टिक जप्त 

घुग्घुस : शहरातील चौकाचौकात अनेकांनी विनापरवाना बॅनर, होर्डिंग लावले होते. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले. त्यामुळे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने शहरातील अनधिकृत बॅनर होर्डिंग हटविण्यात आले. तसेच शासनाने प्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टिकबंदी केली आहे. मात्र तरीसुद्धा शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर करण्यात येत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे मुख्याधिकारी अर्शिया जुही यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने दुकानात धाड टाकून २२ दुकानातील प्लास्टिक जप्त केले. कारवाई करताना घुग्घुस नगर परिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

आठवडाभरात राबविले विविध उपक्रम

घुग्घुस नगर परिषदेतर्फे माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये शहर स्वच्छता अभियान, भाजीपाला विक्रेत्यांना डस्टबिन वितरण, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविण्यात आले. तसेच अनधिकृत बॅनर हटविण्यात आले, तर प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. स्वच्छता मोहिमेत मुख्याधिकारी अर्शिया जुही स्वत: सहभागी झाल्या होत्या.

शहरात अनेकांनी अनधिकृतपणे बॅनर लावले होते. ते बॅनर हटविण्यात आले. ज्यांना बॅनर लावायचे असतील त्यांनी पालिकेची रीतसर परवानगी घेऊनच बॅनर लावावे. तसेच प्लास्टिकचा वापर करणाऱ्या २२ दुकानदारांकडून प्लास्टिक जप्त करण्यात आले. यापुढे प्लास्टिक वापर करताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. – मुख्याधिकारी अर्शिया जुही, घुग्घुस नगर परिषद