मांगुर्ला जंगलात गर्भवती वाघिणीची निर्घृण हत्या

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• वाघिणीच्या पुढच्या पायाचे पंजे गायब, वाघीण गर्भवती असल्याची शक्यता

चंद्रपूर : नखांसाठी एका वाघिणीची निर्घृण हत्या केल्याची घटना झरी तालुक्यातील मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला जवळील जंगलात घडली आहे. रविवारी ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत वाघीणच्या शऱीरावर हत्याराने मारल्याचे घाव असून ती असलेल्या गुहेच्या तोंडाशेजारी आग लावल्याचे आढळून आले आहे. तसेच वाघिणीच्या पुढच्यापायाचे पंजे तोडून नेले आहेत. वाघीण गर्भवती असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पांढरकवडा वनविभागाच्या मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला जवळ वन क्रमांक 30 मध्ये एका नाल्याच्या जवळील एका गुहेत एक वाघ मृत अवस्थेत असल्याची माहिती रविवारी सकाळी वनविभागाला मिळाली. त्यावरून वनविभागाची टीम तसेच डॉक्टर व व्याघ्र संवर्धनाचे प्रतिनिधी सदर ठिकाणी पोहोचले. त्यावेळी त्यांना गुहेच्या तोंडाशी आग लावल्याचे जळालेल्या लाकडांवरून आढळून आले. टीमने तपासणी केली असता मृत ही मादी असून तिचे अंदाजे 4 वर्ष असल्याचे समजते. याशिवाय वाघिणीच्या पुढच्या पायाचे पंजे गायब होते. त्यामुळे शिकारीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येतोय.

पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंड, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर, डॉ. अरुण जाधव-वणी, डॉ. एस एस चव्हाण- झरी, डॉ. डी जी जाधव- मुकुटबन, डॉ. व्ही सी जागडे- मारेगाव यांनी घटनास्थळीच वाघिणीचे शवविच्छेदन केले. सदर वाघीण ही गर्भवती असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृत्यूचे कारण आणि मृतक वाघीण ही गर्भवती होती की नाही हे शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणी प्राथमिक वनगुन्हा दाखल करण्यात आला सून प्रकरणाचा तपास वनसंरक्षण पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनात मुकुटबनचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वारे करीत आहे.