10 ऑक्‍सीजन कॉन्‍सन्‍ट्रेटर मुलसाठी उपलब्‍ध होणार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• 100 बेडेड कोविड केअर सेंटर तयार करावे, 50 ऑक्‍सीजन बेडसला त्‍वरीत मंजुरी दयावी

• आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला मुल शहर व तालुक्‍यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा

चंद्रपूर : मुल शहर आणि तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागात कोरोना रूग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेता मुल शहरात नविन 100 बेडेड कोविड केअर सेंटर तयार करण्‍यात यावे तसेच 50 ऑक्‍सीजन बेडसला मंजुरी दयावी त्‍याचप्रमाणे आरटीपीसीआर चाचणी केंद्रांची संख्‍या वाढवत चाचण्‍यांवर भर दयावा, फलक, लाउडस्पिकर आदींच्‍या माध्‍यमातुन कोरोना विषयक जागृतीवर भर देण्‍याच्‍या सुचना देत विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी 10 लीटर क्षमतेचे 10 ऑक्‍सीजन कॉन्‍सन्‍ट्रेटर मुलसाठी उपलब्‍ध करून देणार असल्‍याचे जाहीर केले. त्‍याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस स्‍टेशन या दोन ठिकाणी ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशिन उपलब्‍ध करणार असल्‍याचे जाहीर केले.  त्‍याचप्रमाणे या तालुक्‍यासाठी एक रूग्‍णवाहीका सुध्‍दा उपलब्‍ध करण्‍यात येईल असेही ते म्‍हणाले.

दिनांक 27 एप्रील रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय मुल येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्‍यांनी मुल शहर व तालुक्‍यातील कोरोना प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीला नगराध्‍यक्षा सौ. रत्‍नमाला भोयर, उपनगराध्‍यक्ष नंदु रणदीवे, प्रभाकर भोयर, प्रशांत समर्थ, महेंद्र करकाडे, अनिल साखरकर, विनोद सिडाम, मिलींद खोब्रागडे, प्रभा चौथाले, विदया बोबाटे, प्रशांत लाडवे, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, नायब तहसिलदार श्री. पवार, संवर्ग विकास अधिकारी, उपजिल्‍हा रूग्‍णालयाचे वैदयकीय अधिक्षक डॉ. इंदुरकर, तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. खोब्रागडे, नगरपरिषदचे तुषार शिंदे, पोलीस निरीक्षक श्री. राजपुत यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार यांनी टेस्‍टींगचे रिपोर्ट 24 तासाच्‍या आत मिळावे यावर भर दिला. लसीकरण केंद्रांची संख्‍या वाढविण्‍याबाबत त्‍यांनी निर्देश दिले. कोविड केअर सेंटर मधील सुविधा उत्‍तम असाव्‍या, विशेषत: भोजन व्‍यवस्‍था उत्‍तम असावी याकडे विशेष लक्ष देण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. उपजिल्‍हा रूग्‍णालय व प्राथमिक आरोग्‍य केंद्रामधील रिक्‍त पदांची भरती लवकर व्‍हावी यासंदर्भात आपण शासनाशी पाठपुरावा करीत आहोतच, स्‍थानिक प्रशासनाने देखील याबाबत पाठपुरावा करण्‍याचे त्‍यांनी सुचित केले. ग्रामीण भागातुन नागरिक चाचण्‍यांसाठी साधनांअभावी येवू शकत नाही, त्‍यांच्‍यासाठी विशेष वाहन व्‍यवस्‍था करण्‍याबाबतही त्‍यांनी सांगीतले. गृह विलगीकरणात घरी एकच शौचालय व मोजक्‍या खोल्‍या असल्‍यामुळे ते योग्‍य पध्‍दतीने होवू शकत नाही, असे रूग्‍ण आयडेन्‍टीफाय करून त्‍यांना कोविड केअर सेंटर मध्‍ये दाखल करावे असेही आ. मुनगंटीवार यांनी सांगीतले. शासकीय डॉक्‍टर तसेच डॉक्‍टरांनी जनजाग़तीबाबत छोटे व्हिडीओज तयार करून समाज माध्‍यमांवर प्रसारीत करावे असेही त्‍यांनी सुचित केले.