97 लाख फसवणूक प्रकरण : औषध व्यावसायिक पती पत्नीवर गुन्हा दाखल

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

यवतमाळ : जिल्ह्यातील वणी येथील रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची 97 लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी वणी येथील औषध व्यावसायीक व त्याच्या पत्नीवर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. रवींद्र दामोधर येरणे व रुपाली रवींद्र येरणे असे गुन्हा दाखल झालेले व्यक्तीची नावे आहे.

प्राप्त माहितीनुसार, वणी येथील रवींद्र दामोधर येरणे यांनी औषध खरेदीसाठी तर त्याची पत्नी रुपाली रवींद्र येरणे हिने कोचिंग व ट्रेडिंग व्यवसायासाठी रंगनाथ स्वामी सहकारी नागरी पतसंस्थेच्या वणी शाखाकडे वर्ष 2013 मध्ये 25- 25 लाख कर्ज मागणी केली होती. कर्जाच्या मोबदल्यात सुरक्षाठेव म्हणून येरणे दाम्पत्याने मौजा लालगुडा, ता. वणी येथील 2.28 हे.आर. शेतजमीन रंगनाथ स्वामी पत संस्थेकडे नोंदणीकृत गहाण ठेवली.

सुरवातीला काही हप्ते कर्जाची रक्कम भरल्यानंतर येरणे दाम्पत्याने हप्ते भरणे बंद केले. रंगनाथ स्वामी पत संस्था कर्ज वसुली विभागाने येरणे दाम्पत्याला अनेकदा नोटीस देऊनही त्यांनी प्रतिसाद दिले नाही. अखेर पत संस्थेनी कर्जाची वसुलीसाठी गहाण ठेवलेली मालमत्ता अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरु केली. तेव्हा सहकार अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की कर्जदार येरणे दाम्पत्याने संस्थेकडे गहाण ठेवलेली मौजा लालगुडा येथील 2.28 हे.आर.शेतजमीन बनावट कागद पत्र बनवून इतर 2 बँका व 1 फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवून कर्जाची उचल केली आहे.

कर्जदाराकडील मुद्दल व त्यावरील व्याज असे एकूण 97 लाख 11 हजार 78 रु. पत संस्थेला घेणे असून संस्थेची फसवणूक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे रंगनाथ स्वामी सहकारी नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघशाम बळीराम तांबेकर रा. वणी यांनी 26 एप्रिल 2021 रोजी कर्जदार दाम्पत्यविरुद्द संस्थेचीची फसवणूक केल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात नोंदवली.

पोलिसांनी आरोपी रवींद्र दामोधर येरणे व रुपाली रवींद्र येरणे रा. वणी विरुद्द भादंवि कलम 420, 465, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे करीत आहे.