‘एसपी यवतमाळ’ नावानं Fake Facebook अकाऊंट उघडुन ढोंग करत मागितली ‘एवढी’ रक्कम

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

यवतमाळ : एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क ‘एसपी यवतमाळ’ नावानं बनावट फेसबुक अकाऊंट तयार केलं होतं. या भामट्यानं थेट एसपींना रुग्णालयात दाखल केल्याचं सांगून फेसबुकवरील मित्रांना पैसे मागितले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बनावट अकाऊंट बंद करून संबंधीत आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या नावानं ‘एसपी यवतमाळ’ हे कार्यालयीन फेसबुक अकाऊंट आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास एका अज्ञात इसमानं ‘एसपी यवतमाळ’ नावानं एक नविन फेसबूक अकाऊंट तयार केलं. त्यानं जिल्हा पोलीस अधिक्षकांचा फोटो आणि नाव वापरलं. आरोपीनं पोलीस अधिक्षकांचे मित्र आणि नातेवाइकांशी मेसेंजरवर चॅटिंग करत आर्थिक अडचणीत आल्याचं सांगितलं. मी रुग्णालयात दाखल आहे, मला पैशांची गरज आहे, असं सांगून मित्रांकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर पैश्याची मागणी सुरू केली. गुगल पे असेल तर अर्जंट पैसे पाठवा, असा मेसेज अनेकांना केला.

या प्रकारामुळे एक फेसबुक मित्र गोंधळला आणि त्यानं थेट पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती देत चौकशी केली. त्यावेळी एसपी यवतमाळ नावानं बनावट अकाऊंट तयार झाल्याची बाब निदर्शनास आली. या प्रकरणामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी बनावट अकाऊंट लगेचच बंद केलं. त्यानंतर यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

दरम्यान, शहर पोलिसांनी बनावट अकाऊंट तयार करणाऱ्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी यवतमाळ जिल्हा सायबर सेलचे प्रमुख सहायक पोलिस निरिक्षक अमोल पुरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर बनावट अकाऊंट बंद केले असून या प्रकरणी गुन्हा नोंद केल्याचं सांगितलं आहे.