राज्यात लॉकडाऊनमध्ये 10 दिवसांची वाढ होणार?

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरुवातीला वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर राज्यात कडक निर्बंधांसह लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वांनाच घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला. परिणामी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ही हळूहळू कमी होत असताना पाहायला मिळत आहे.

रुग्णसंख्या कमी होत असतानाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणखी 10 दिवस हा लॉकडाऊन वाढवू शकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत मंगळवारी अनेक मंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे विनंती केल्याची माहिती समोर येत आहे.

ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपल्याला संपूर्ण तयारी करून घ्यावी लागेल, असं मत महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून लॉकडाऊन वाढवायचा की, नाही याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.

1 मे पासून 18 वर्षांच्यावरील सर्व नागरिकांना सरसकट लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. मात्र, लसींच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणं हे राज्य सरकारसाठी एक प्रकारे आव्हानच बनलं आहे. तसेच मंत्रिमंडळातील मंत्री उदय सामंत, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार तसेच छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात संकेत दिले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.