पाटील नंतर खडसे पती-पत्नीच्या मृत्युने पुन्हा एका कामगार कुटुंबातील मुले अनाथ झाली
मृतक कामगारांना नियोजन भवनात घुसून श्रद्धांजलि अर्पण करणार : पप्पू देशमुख यांचा इशारा
कॅन्सरचे निदान झालेल्या कामगारावरही उपचारासाठी भीक मागण्याची वेळ
चंद्रपूर : एप्रिल २०२० मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटदारा मार्फत अनेक वर्षांपासून सुतार काम करणारे प्रदीप खडसे या कामगारांचा ६ महिन्यांपासून थकीत असलेल्या पगाराच्या मानसिक तणावाने मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मृत्यू झाला. त्यानंतर खडसे यांची पत्नी वर्षा खडसे यांना कंत्राटी कामगार म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नोकरी देण्यात आली. वर्षा खडसे यांना सुद्धा मागील १० महिन्यापासून पगार मिळालेला नाही.
अशातच दिनांक २७ मे २०२१ रोजी कोविडचे उपचार घेत असताना रामनगरच्या वैद्यकीय महाविद्यालयातीलतील कोविड रुग्णालयांमध्ये वर्षा खडसे यांचेसुध्दा निधन झाले. माय-बाप दोघेही गेल्याने खडसे दांपत्याचे दोन्ही मुले अनाथ झाले. थकित पगाराच्या मानसिक धक्क्याने यापूर्वी ऑगस्ट २०२० मध्ये संगीता पाटील व त्यांच्या पतीचे निधन झाल्याने त्यांचा एकुलता एक पोरगा अनाथ झाला होता. आता खडसे पती-पत्नीच्या मृत्यू नंतर थकीत पगाराने अनाथ झालेले हे दुसरे कुटुंब आहे. विशेष म्हणजे एप्रिल २०२० म्हणजेच मृत्यू पूर्वीचा ६ महिन्याचा थकीत पगार अजून पर्यंत प्रदीप खडसे यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला नाही. ८ वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या प्रदीप खडसे यांचे नाव अजय पेंढारकर नावाच्या लिपिकाने पगाराच्या यादीतून काढून टाकले. कंत्राटी कामगारांना या पूर्वीचे थकीत पगार देताना खडसे यांच्या प्रमाणे काही जुन्या कंत्राटी कामगारांचे नाव पेंढारकर यांनी यादीतून का वगळले याची चौकशी होणे गरजेचे असतानाही हे प्रकरण दडपण्यात आले. खायला पैसे नाही, उपचार घ्यायला पैसे नाही, त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कामगाराच्या कुटुंबातील सदस्यांना आजारपण अंगावर काढावे लागत आहे. खडसे दाम्पत्याचे मूल अनाथ झाले. त्यानंतर कॅन्सरचे निदान झालेल्या एका कामगाराला उपचारासाठी भीक मागण्याची वेळ आलेली आहे. या कॅन्सरग्रस्त कामगाराचा सुद्धा सात म्हणायचा थकीत पगार अजूनपर्यंत मिळालेला नाही.या सर्व गैरप्रकाराला वैद्यकीय शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकारी तसेच महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार आहे.
सरकारला जाग आणण्यासाठी सोमवार दिनांक ३१ मे रोजी नियोजन भवनाच्या आतमध्ये घुसून मृतक कामगारांना श्रद्धांजली अर्पण करणार असा इशारा जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिला.