नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रतिष्ठानांकडून २१ हजाराचा दंड वसूल

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
चंद्रपूर : कोरोना काळात सर्वांनी नियमांचे पालन करा, असे आवाहन मनपातर्फे वारंवार करण्यात येत आहे. तरी सुद्धा शहरातील काही प्रतिष्ठाने तसेच नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. आशा प्रतिष्ठानांवर सोमवारी (ता. २८) मनपाने कारवाई करून २१ हजाराचा दंड वसूल केला.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. २ चे सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, सुरक्षा रक्षक आणि टीमच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. 

झोन क्र. २ अंतर्गत कोव्हीड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत स्टार एजन्सी, माधवदास मेठवानी, मेणाराम चौधरी आणि शरीफ अली यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन एकुण २१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. यापुढेही नियमांचे उल्लंघन केल्यास प्रसंगी प्रतिष्ठान सील करण्यात येईल, अशी ताकीद मनपाकडून देण्यात आली.