चंद्रपूर : कोव्हिड पॉझिटिव्ह असताना सौम्य लक्षण असल्यास स्वत:च्या मताने किंवा सोशल मीडियावर येणारी औषधे घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा. मधुमेह नियंत्रित ठेवल्यास ‘म्युकरमायकोसिस’ अर्थात काळी बुरशीच्या आजारावर नक्कीच मात करता येईल,असा विश्वास मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, डॉ. अविष्कार खंडारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गट्टानी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी (म्युकरमायकोसिस) डॉ. आकाश कासटवार यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरच्या वतीने महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी “संवाद” या फेसबूक लाइव्ह कार्यक्रमाचे आयोजन २८ मे रोजी करण्यात आले होते. म्युकरमायकोसीस या विषयावर ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, डॉ. अविष्कार खंडारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गट्टानी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी (म्युकरमायकोसिस) डॉ. आकाश कासटवार यांनी मार्गदर्शन केले.
“म्युकरमायकोसिस” हा आजार कोरोना विषाणूमुळे उद्भवणारा एक बुरशीजन्य संसर्ग आहे. तो अतिशय वेगाने पसरतो. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, उगाच मनात भीती बाळगून घाबरून नये. मात्र गाफीलही राहू नये, असे आवाहन यावेळी डॉक्टरांनी केले. हा विषाणू साधारणपणे नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करते. प्रामुख्याने हा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत फैलावत असल्याचे आढळून येत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर “म्युकरमायकोसिस” हा बुरशीजन्य आजार विशेषत्वाने मधुमेही, मूत्रपिंडाशी संबंधित आजार, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींना होत असल्याचे आढळून येत आहे. अशा व्यक्तींनी सहा आठवड्यापर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे, असे यावेळी डॉक्टरांनी सांगितले.
म्युकरमायकोसिस’ अर्थात काळी बुरशी या आजाराची अनेक लक्षणे आहेत. सामान्यरित्या डोळे लाल होणे, खाज येणे अशी लक्षणे म्हणजे ‘म्युकरमायकोसिस’ असू शकत नाही. त्यामुळे उगाच घाबरून दवाखान्यात गर्दी करून स्वत:ला कोरोनच्या संकटात टाकण्यापेक्षा योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. चेह-यावर सूज येणे, चेह-याचा भाग दुखणे, डोळ्यावर सूज येणे, डोळ्याचा पांढरा भाग लाल होणे, डोळा बाहेर आल्यासारखे वाटणे, दृष्टी कमकुमत होणे, अंधुक दिसणे, अर्धांगवायूसारखे वाटणे अशी लक्षणे दिसल्यास ती ‘म्युकरमायकोसिस’ चा धोका संभावू शकतो. त्यामुळे सतर्क राहून लक्षणांकडे लक्ष द्या. स्वत:च्या मनाने कुठलेही उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा प्राधान्याने सल्ला घ्या, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.