वरोरा वनपरिक्षेत्रात गळ्यात लालपट्टा असलेला वाघ आढळला

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
• वाघ कुठल्या प्रकल्पातून आला, याची शहानिशा करणे सुरू
• शोध मोहिमेसाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील चमू दाखल

चंद्रपूर : वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सालोरी कक्ष क्रमांक ११ मधील जंगलात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहे. याच परिसरात वाघाचे वास्तव्य आहे. वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्याकरिता वन विभागाने अनेक ठिकाणी कॅमेरे लावले असून या कॅमेरामध्ये गळ्यात लाल पट्टा लावलेला वाघ कैद झाला. कॅमेरामध्ये लाल पट्टा असलेला वाघ बघून वनविभाग सतर्क झाला याबाबतची माहिती वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना देऊन त्या परिसरात शोधमोहिम वनविभाग राबवित असून या शोध मोहिमेत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एक चमू दाखल झाली आहे.

नेमका वाघ हा कुठल्या प्रकल्पातून आला, याची माहिती अद्याप समोर आली नाही. शहानिशा करणे सुरू आहे. दोन वाघांमध्ये झुंज झाल्यास हरलेला वाघ ती जागा सोडतो व एखाद्या मादीच्या शोधात वाघ भटकत असतो, असे मानले जात आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील काही वाघांना रेडिओ कॉलर चीप लावण्यात आली आहे. वरोरा परिसरात आढळलेला वाघ दुसऱ्या प्रकल्पातील असू शकतो.
:  डॉ. जितेंद्र रामगावकर,
क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प.