• जिल्हा परिषद सदस्यांनी केला पाठपुरावा
• लसीकरणादरम्यान कोविड नियमाचे पालन करा
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथे नवीन लसीकरण केंद्राला मंजुरी प्रदान करण्यात आले आहे. जि प सदस्य शिवचंद्र काळे यांनी नागरिकांची मागणी लक्षात घेता वारंवार पाठपुरावा केल्याने केंद्राला मंजुरी मिळाली आहे. सदर केंद्रावर कोविड नियमांचे तंतोतंत पालन करून लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून नांदा येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यास टाळाटाळ सुरु होती. येथील जिल्हा परिषद सदस्य तथा कामगार नेते शिवचंद्र काळे यांनी जिल्हा परिषदेच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झुम अॅपद्वारे घेण्यात आलेल्या सभेत नांदाफाटा येथील लोकसंख्येचा विचार करून लसीकरण केंद्र तातडीने सुरू करण्याची प्रशासनाला विनंती केली. दोनदा झालेल्या सभेत मुद्दा लावून धरला परंतु प्रशासन लसीचा तुटवडा व आरोग्य केंद्र नसल्याचे कारण देत लसीकरण केंद्र देण्यास टाळाटाळ करीत होते. नांदाफाटा परिसरातील वाढता कोरोनाचा संसर्ग , लसीकरणा करिता नागरिकांची होणारी भटकंती यामुळे जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर यांचेकडे मागणीलावून धरली होती. जर केंद्र सुरू केले नाही तर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.
अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी नांदाफाटा येथे तातडीने लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच सांस्कृतिक भवन नांदाफाटा येथे लसीकरण केंद्र सुरू होत आहे. यात नांदा ग्रामपंचायतीने सहकार्य करून लसीकरण केंद्राकरिता कम्प्युटर व डाटा ऑपरेटर उपलब्ध करून दिला आहे. ४५ वर्षावरील नागरिकांनी आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.